- वाहनचालकांच्या जनजागृतीसाठी वाहतूक पोलिसांची युक्ती…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १६ जुलै २०२४) :- अनेक वाहनचालक वाहतुकीचे नियम पाळत नसल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे वाहतूक पोलिसांनी पिंपरी चिंचवड शहरातील चौकात स्पीकरवरून वाहतुकीचे नियम पाळण्याच्या सूचना देण्यास सुरुवात केली आहे. ‘वाहतुकीचे नियम पाळा, जीवन सांभाळा’, ‘वेगावर नियंत्रण ठेवा’ अशा सूचनांचे ऑडिओ लावण्यात आले आहेत.
वाहतुकीचे नियम न पाळल्याने अनेकवेळा गंभीर अपघात होतात. सिग्नल न पाळल्यास चौकात वाहतूक कोंडी होते. परिणामी रस्त्यांवरील वाहतूक विस्कळीत होते. यासाठी वाहतूक पोलिसांची नियुक्ती केलेली असते. आता वाहनचालकांची जनजागृती करण्यासाठी वाहतूक पोलिसांनी युक्ती योजली आहे.
पिंपरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकामध्येही स्पीकरवरून थेट सूचना देण्यात येत आहेत. स्पीकरवरून ‘वाहतुकीचे नियम पाळा, जीवन सांभाळा’, ‘आवरा वेगाला, सावरा जिवाला’ असे आवाहन केले जात आहे. अतिवेगात वाहन चालवू नका, सिग्नल पाळा, झेब्रा क्रॉसिंगच्या पुढे जाऊ नका, अशा सूचनाही केल्या जात आहेत. वाहनचालकांचा याला चांगला प्रतिसाद मिळत असून, पिंपरी चौकामध्ये वाहतुकीचे नियम पाळण्याकडे बहुतांश वाहनचालक लक्ष देत आहेत.
शनिवारी, रविवारसह अन्य दिवशीही मोठी वर्दळ असते. त्यात अनेकजण वाहतुकीचे नियम पाळत नसल्याने वाहतूक कोंडी होते. पिंपरी चौकातही वाहनचालक वाहतुकीचे नियम न पाळता सिग्नल मोडतात. अनेकदा उन्हात फार वेळ उभे राहायला नको म्हणून रस्त्याच्या कडेला गाड्या लावतात. त्यामुळेही वाहतूक कोंडी होते.














