- आज तब्बल पंचवीस माजी नगरसेवकांचा पवारांच्या पक्षात पक्षप्रवेश?..
- आता दादांचा पक्ष वाचविण्यासाठी संकटमोचकाची जबाबदारी कोण घेणार?…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १७ जुलै २०२४) :- राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) शहराध्यक्ष अजित गव्हाणे, विद्यार्थी आघाडीचे अध्यक्ष यश साने, शहर कार्याध्यक्ष राहुल भोसले आणि भोसरी विधानसभा क्षेत्राचे अध्यक्ष पंकज भालेकर यांनी मंगळवारी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्याकडे पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा सादर केला. त्यांच्यासह २५ माजी नगरसेवकांचा आज बुधवारी (दि. १७) पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश होणार आहे.
पिंपरी-चिंचवड अजित पवारांचा बालेकिल्ला मानला जातो. मात्र, याच बालेकिल्ल्याला शरद पवार यांनी सुरूंग लावला आहे. विशेषतः लोकसभा निवडणुकीनंतर या गटाला पिंपरी- चिंचवडमध्ये धक्के सोसावे लागत आहेत. मंगळवारी शहरातील २५ माजी नगरसेवक, पदाधिकाऱ्यांना सोबत घेत शहराध्यक्ष गव्हाणे यांनी पक्षाचा राजीनामा दिला.
शरद पवार यांच्याबाबत अजूनही सहानुभूतीची लाट असल्याचे दिसून आले. त्याचीच परिणीती पक्ष प्रवेशात झाल्याचे दिसून येत आहे. राष्ट्रवादीच्या फुटीनंतर गव्हाणे यांच्यासह इतर पदाधिकाऱ्यांनी अजित पवार यांची पाठराखण केली होती. मात्र, हा गट महायुतीत सामील झाल्यानंतर आणि लोकसभा निवडणुकीत शरद पवार यांच्या बाजूने सहानुभूतीची लाट दिसून आल्यानंतर सर्वांनी घरवापसीचा निर्णय घेतला. पंधरा दिवसांपूर्वी त्यांनी शरद पवार यांची भेट घेतली होती. तेव्हाच त्यांच्या पक्ष बदलाचे संकेत मिळाले होते. त्यामुळे पिंपरी चिंचवड शहरात अजित पवारांच्या पक्षाला सावरण्यासाठी ऐनवेळी संकटमोचक कोण होणार असा सवाल राजकीय जाणकार व्यक्त करीत आहेत.
आज पुण्यात राष्ट्रवादीचे सर्वोसार्वा शरद पवार साहेब यांच्यासोबत माजी नगरसेवकांची बैठक संपन्न होणार आहे. पक्ष प्रवेशाबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. तरीही ऐनवेळी शरद पवार यांच्या उपस्थितीत सर्वांचा राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षात अधिकृत प्रवेश होऊ शकतो, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली आहे.


















