न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १७ जुलै २०२४) :- महापालिकेच्या ‘ड’ क्षेत्रीय कार्यालयाकडून गृहनिर्माण संस्थांमध्ये निर्माण होणारा ओला कचरा १५ जुलैपासून उचलण्यात येणार नसल्याचे नोटीसद्वारे सोसायट्यांना कळविण्यात आले होते. त्यामुळे सोसायटीमधील रहिवासी हवालदिल झाले होते. दरम्यान, ज्या सोसायट्यांनी कचरा उचलण्यासाठी मालमत्ता करात सवलत घेतली आहे, त्या सोसायट्या वगळता अन्य सोसायट्यांचा कचरा महापालिका उचलणार असल्याचे आयुक्त शेखर सिंह यांनी स्पष्ट केले आहे
स्वच्छ भारत अभियान अंतर्गत घनकचरा व्यवस्थापन नियम २०१६ अनुसार ओला कचरा व सुका कचरा वेगवेगळा करणे, तसेच ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करणे बंधनकारक आहे. घर, परिसर, व्यवसाय आदी ठिकाणी उत्पन्न होणारा ओला, सुका कचरा वेगवेगळा करणे हे कायदेशीररित्या अनिवार्य केले आहे. सध्या महापालिकेकडून शहराच्या विविध भागातील कचरागोळा केला जातो. निर्माण होणारा ओला कचरा १५ जुलैपासून महापालिका उचलणार नसल्याचे गृहनिर्माण सोसायट्यांना ‘ड’ क्षेत्रीय कार्यालयाकडून कळविण्यात आले होते. त्यामुळे सोसायटीतील रहिवाशांचा गोंधळ उडाला आहे.
सोसायट्यातील ओला कचरा निर्मुलनाचा विषय गेल्या दोन निवडणुकांपासून गाजत आहे. हा विषय सुटावा म्हणून यापुर्वी बैठका देखील झाल्या आहेत. परत हा मुद्दा आता समोर आला आहे. ‘ड’ क्षेत्रीय कार्यालयाकडून त्याबाबत काही सोसायट्यांना नोटीसा देखील बजावल्या आहेत. प्रत्येक वॉर्डनिहाय महा पालिकेने किमान दहा-दहा गुंठे जागेत कचरा संकलन आणि विघटनाची सोय केल्यास नागरिकांची गैरसोय दूर होणार आहे. सोसायटीधारक महापालिकेचा कर भरत असताना त्यांनी निर्माण होणारा ओला कचरा प्रक्रिया करण्यासाठी खासगी संस्थांना कशासाठी द्यायचा? महापालिकेने ही जबाबदारी उचलायला हवी, असा व्होरा शहरातील बहुतांशी हाऊसिंग सोसायट्यांचा आहे.
ज्या सोसायट्यांनी कचरा निर्मूलनासाठी मालमत्ता करात सवलत घेतली आहे. त्या सोसायट्यांनी ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करणे गरजेचे आहे. त्यांना नोटिसा बजावलेल्या आहेत. मात्र, अन्य सोसायट्यांचा कचरा महापालिका उचलणार आहे.
– शेखर सिंह, आयुक्त, महापालिका…














