न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १८ जुलै २०२४) :- महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण रुग्णालयासह काही रुग्णालय पालिकेच्या आस्थापनांमधील प्रशासकीय कामकाज हाताळण्यासाठी मुख्य आस्थापनेवरील अधिकारी उपलब्ध नसल्यामुळे प्रमुख अधिका-यांचे कामकाज लिपिकांमार्फत केले जात आहे. त्यांच्याजागी प्रशासकीय संवर्गातील मुख्य अधिकारी नियुक्त करण्याची मागणी महाराष्ट्र राज्य शासकीय निमशासकीय लिपीक संवर्गीय हक्क परिषदेच्या वतीने करण्यात आली आहे.
आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांना निवेदन देण्यात आले आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, वायसीएम रूग्णालयासह इतर रुग्णालय, क्षेत्रीय कार्यालयातील स्थापत्य, विद्युत, आरोग्य विभागातील आस्थापनाविषयक कामकाज लिपिकांकडून केले जात आहे. वास्तविक पाहता लिपिक संवर्ग हा प्रशासकीय संवर्ग असून त्यांच्या आस्थापना विषयक सर्व बाबींवर नियंत्रण हे प्रशासकिय संवर्गातील मुख्य अधिका-यांचे असणे अपेक्षित असते. परंतु, या विभागांना सामान्य प्रशासन विभागाने कामकाजासाठी पुरविलेले लिपिक व शिपाई यांचा प्रशासकीय संवर्ग आहे. त्यांच्या सर्व आस्थापना विषयक कामकाजावर सहा. आयुक्त व प्रशासन अधिकारी यांचे नियंत्रण असणे आवश्यक आहे. परंतु, प्रशासकीय संवर्गातील अधिकारी उपलब्ध नसल्याने उप अभियंता, कार्यकारी अभियंता, सहा. आरोग्याधिकारी, डॉक्टर, मुख्याध्यापक यांना अधिकार प्रदान केलेले आहेत.
लिपिक संवर्ग हा तांत्रिक, आरोग्य, शैक्षणिक, वैद्यकीय असून त्यांनी एलएसजीडी, एलजीएस, एमपीएससी किंवा विभागीय परीक्षा उत्तीर्ण केलेली नसते. त्यामुळे लिपिकांना कामाची पोहोच नसते. रुग्णांची संख्या पाहता अनेक संवर्गाला उचित मार्गदर्शन नसल्याने प्रशासकीय कामकाजामध्ये गतिमानता येत नाही. वायसीएम रुग्णालयामधील कर्मचारी वर्गाची कामे डॉक्टरांना पहावी लागत असल्याने त्यांना रुग्णांवर उपचार करण्यास वेळ मिळत नसून त्यांचा सर्वात जास्त वेळ हा प्रशासकीय कामकाजात जात आहे. सर्व विभागातील व आहरण वितरण वरील सर्व मुख्य पदावर मुख्य संर्वगातील अधिकारी नियुक्त करण्यात यावेत, अशी मागणी करण्यात आली आहे.














