न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २३ जुलै २०२४) :- ज्यांनी कधीच नोकरी केली नाही, अशा एक कोटी तरुणांना कौशल्य प्रशिक्षण देऊन 5000 मासिक भत्त्यासह 12 महिन्यांची पंतप्रधान इंटर्नशिप करता येणार आहे. त्यामुळे तरुणांच्या हाताला काम मिळणार असून बेरोजगारी नष्ट होणार आहे. त्याचबरोबर स्टार्टअप्समधील गुंतवणुकदारांना युपीए सरकारने लावलेला एंजल टॅक्स मोदी सरकारने रद्द केला आहे. त्यामुळे उद्योगाला चालणार मिळणार असून आर्थिक प्रगती साधली जाणार आहे, अशी प्रतिक्रिया पिंपरी-चिंचवड महापालिका क्रीडा समितीचे माजी सभापती चंद्रकांत नखाते यांनी व्यक्त केली.
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामण यांनी आज देशाचा अर्थसंकल्प सादर केला. त्यामध्ये सर्व घटकाचा विचार करुन पायाभूत सुविधा विकसित करण्याचा संकल्प करण्यात आला आहे. ग्रामीण भागाबरोबरच शहरी भागात पायाभूत सुविधा आणि गुंतवणुकीवर भर देण्यात आला आहे. त्यासाठी भांडवली खर्चाची 33.4 टक्के तरतूद केली आहे. म्हणजेच एकूण 10 लाख कोटी रुपये खर्च करण्याची तयारी केंद्राने दाखवली आहे. तसेच, अर्थसंकल्पात नवीन कर प्रणाली निवडणाऱ्यांसाठी आता 7.75 लाख रुपयांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त केले आहे. म्हणजेच त्यांना 17.5 हजार रुपयांचा फायदा होणार आहे, असेही नखाते यांनी म्हटले आहे.
महाराष्ट्राला पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी व्याजमुक्त कर्जाची घोषणा केली आहे. रेल्वेचे जाळे मजबूत करण्यासाठी 2.4 लाख कोटींचा भांडवल पुरवठा करण्याची योजना आखली आहे. उद्योजक, कामगार, शेतकरी, मजूर अशा सर्वांचा विचार अर्थसंकल्पात करण्यात आला आहे. त्यातून अर्थव्यवस्थेतील सर्व घटकांपर्यंत पायाभूत सुविधांच्या विकासाचे फायदे पोहोचवता येणार आहेत, ही बाब समाधानकारक आहे, अशी प्रतिक्रिया नखाते यांनी व्यक्त केली.












