न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २६ एप्रिल २०२५) :- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या नवीन भोसरी, जिजामाता, थेरगाव, आकुर्डी, सांगवी, यमुनानगर आणि वायसीएम रुग्णालयाकडील भुलशास्त्र विभागासाठी वैद्यकिय विभागाच्या मागणीनुसार (Color Doppler Ultrasound Machine) या सोनोग्राफी मशीनची खरेदी करण्यात आली आहे. त्यामुळे सोनोग्राफी अभावी शहरातील रुग्णाची होणारी गैरसोय थांबणार आहे.
दरम्यान या साहित्याची खरेदी ही प्रि- बीड अमेटमेंटनुसार झाली नाही, अशी शंका उपस्थित होत आहे. त्यामुळे मशीन खरेदीच्या निविदा प्रक्रियेची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी शहरातील करदाता नागरिक राहुल कोल्हटकर यांनी महापालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
निविदेच्या प्रि – बीड मीटिंगमध्ये जे ठेकेदार अथवा कंपन्या सहभागी झाल्या होत्या, त्यांना मशीन खरेदीबाबत कोणत्या सूचना केल्या होत्या?. त्यानुसार मशीन खरेदीसाठी एक प्रि- बीड अमेटमेंट अहवाल आयुक्त आणि वैद्यकिय अधिकारी यांच्या मान्यतेने तयार केला असेल तरी, वस्तूचा पुरवठा हा त्याच प्रि- बीड अमेटमेंट अहवाल नुसार झाला आहे का? याची पाहणी वैद्यकिय अधिकारी यांनी केली आहे का?, असे या निवेदनात म्हटले आहे.















