- घटक पक्ष बालेकिल्ले राखण्याच्या भूमिकेवर ठाम…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. ३० नोव्हेंबर २०२५) :- महापालिका निवडणुका जवळ येत असताना पिंपरी-चिंचवडमध्ये महायुतीतील जागावाटपाचा प्रश्न अधिकच गुंतागुंतीचा बनत आहे. भाजप, शिंदे सेना, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आणि रिपाई (आठवले गट) यांच्यात चर्चा सुरू असली तरी प्रत्येक पक्ष आपापल्या मजबूत प्रभागांवर ठाम भूमिका घेत असल्याने तिढा कायम आहे.
२०१७ च्या निवडणुकीतील भक्कम कामगिरीच्या जोरावर भाजपने बहुतेक प्रभागांत आपले वर्चस्व कायम राखण्याचा दावा केला आहे. तर शिंदे सेना आणि राष्ट्रवादीने प्रतिष्ठेच्या भागात जागा मिळाव्यात, असा आग्रह धरला आहे. नव्या आरक्षण सोडतीमुळे समीकरणे बदलल्याने उमेदवार निवडीची प्रक्रिया अनेक प्रभागांत पुन्हा सुरू झाली आहे.
चिंचवड, आकुर्डी, भोसरी, सांगवी व पिंपळे सौदागर परिसरातील सामाजिक रचना, स्थानिक नेत्यांचा प्रभाव आणि गटबाजी लक्षात घेऊन पक्षांनी आपली भूमिका अधिक कडक केली आहे. अजित पवार गटाने काही भागांत आपले स्थानिक जाळे मजबूत असल्याचा दावा केला असून रिपाईने १५ जागांची मागणी पुढे केली आहे.
महायुतीकडून पुढील काही दिवसांत प्राथमिक जागावाटपाचा फॉर्म्युला जाहीर होण्याची शक्यता आहे. मात्र परस्पर मागण्या, संघटनात्मक गणिते आणि बदललेली राजकीय परिस्थिती लक्षात घेता अंतिम निर्णयासाठी अजून वेळ लागू शकतो, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.












