- धडक कारवाईत ७ महिलांची सुटका, मालक अटकेत…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. ३० नोव्हेंबर २०२५) :- पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाने पिंपळे सौदागरमध्ये मोठी कारवाई करत प्रतिष्ठित Spa सेंटरच्या आड सुरू असलेला वेश्या व्यवसाय उघडकीस आणला. पिंपळे सौदागरमधील एका बिल्डिंगमधील सुरू असलेल्या या अवैध व्यवसायातून ईशान्य व इतर राज्यातील अशा ७ महिलांची सुटका करण्यात आली. सुटका झालेल्यांमध्ये नागालँड, मिझोराम, त्रिपुरा, केरळ आणि महाराष्ट्रातील महिलांचा समावेश आहे.
स्पा मालक अभिजित लोरन्स (३०, रा. पिंपळे सौदागर, मूळ केरळ) याने महिलांना पैशाचे आमिष दाखवून व्यवसायात ढकलल्याचे उघड झाले असून, त्याला सांगवी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता व पिटा कायद्यांतर्गत अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी बनावट ग्राहक पाठवून शहानिशा करून छापा टाकला.
ही कारवाई पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, सहआयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, अप्पर आयुक्त सारंग आवाड, डीसीपी डॉ. शिवाजी पवार यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन गिते यांच्या पथकाने केली.












