न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. ३० नोव्हेंबर २०२५) :- दिघी परिसरात पुन्हा एकदा जंगली प्राण्यांच्या वावराने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. संत निरंकारी मंडळाजवळील नव्या रस्त्यालगत असलेल्या लष्करी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या (सीएमई) अपूर्ण भिंतीपलीकडील दाट झाडीत गेल्या काही दिवसांपासून तरस प्राणी वारंवार दिसत आहे.
रस्त्याच्या डाव्या बाजूस राहणाऱ्या नागरिकांनी तरस काही फुटांवर दिसल्याचे सांगितले असून अचानक समोर आल्याने रहिवाशांची भंबेरी उडाली आहे. सीएमईच्या अपूर्ण भिंतीतील मोठ्या जागा जंगली प्राण्यांसाठी सहज प्रवेशमार्ग बनल्या आहेत.
चार दिवसांपूर्वी एका स्थानिक महिलेजवळ तरस आलेल्या घटनेनंतर नागरिकांमध्ये भीती अधिक वाढली आहे. परिसरात घराबाहेर शेळ्या-जनावरे ठेवणारी अनेक कुटुंबे तसेच रस्त्यावर खेळणारी मुले संभाव्य धोक्यात आहेत. कोणतीही दुर्घटना टाळण्यासाठी वनविभाग व सीएमई प्रशासनाने तातडीने प्रतिबंधक उपाययोजना कराव्यात, अशी नागरिकांची मागणी आहे.












