- महापालिकेच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांची कायमस्वरुपी नियुक्तीसाठी आंदोलनाची तयारी..
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०४ डिसेंबर २०२५):- पिंपरी चिंचवड महापालिकेत गेली दोन दशके अत्यल्प मानधनावर शैक्षणिक कामे करणाऱ्या समग्र शिक्षा योजनेतील कंत्राटी कर्मचाऱ्यांनी शासकीय सेवेत समाविष्ट करण्याची मागणी पुन्हा एकदा धसास लावली आहे. मागण्यांकडे शासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करत, “कायम करा, अन्यथा इच्छा मरण द्या” असा तीव्र इशारा देत येत्या ८ डिसेंबरला नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात बेमुदत उपोषणाला बसण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हे आंदोलन समग्र शिक्षा संघर्ष समितीच्या नेतृत्वाखाली होणार आहे.
पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीत समग्र शिक्षा योजनेचे ३३ कर्मचारी कार्यरत होते. त्यापैकी १७ विशेष शिक्षकांना शासकीय सेवेत कायम करण्यात आले असले, तरी उर्वरित १६ कर्मचाऱ्यांबाबत कोणताही निर्णय झाला नाही. या कर्मचाऱ्यांमध्ये २ डाटा एन्ट्री ऑपरेटर, २ लेखा लिपिक आणि १२ विषय मार्गदर्शकांचा समावेश आहे. अनेक कर्मचाऱ्यांच्या कंत्राटी सेवेला अवघे तीन ते सहा महिनेच शिल्लक आहेत, तर मागील चार वर्षांत तब्बल ५० टक्के कर्मचाऱ्यांच्या सेवांची समाप्ती झाल्याची माहिती समितीकडून देण्यात आली.
सरल पोर्टल, यूडायस प्लस प्रणाली, विद्यार्थी–शाळा डेटा, मान्यता संबंधित कामे अशा महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सांभाळूनही कायमस्वरुपी नियुक्तीसाठी संघर्ष करावा लागत असल्याची खंत कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली. शासनाने तातडीने निर्णय न घेतल्यास तीव्र आंदोलन अपरिहार्य असल्याचा इशारा समितीने दिला आहे.












