- निवृत्तीला दोन वर्षे बाकी असतानाच निर्णय; पालिका वर्तुळात चर्चांना उधाण…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०४ डिसेंबर २०२५):- पिंपरी-चिंचवड महापालिकेचे शहर अभियंता मकरंद निकम यांनी स्वेच्छानिवृत्ती घेण्यासाठी आयुक्त तथा प्रशासक श्रावण हर्डीकर यांच्याकडे औपचारिक विनंती अर्ज सादर केला आहे. त्यांच्या सेवानिवृत्तीला अंदाजे दीड ते दोन वर्षांचा कालावधी शिल्लक असतानाच त्यांनी अचानक निवृत्तीची इच्छा व्यक्त केल्याने महापालिका वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.
मकरंद निकम यांची १ जून २०२२ रोजी शहर अभियंता म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. त्यापूर्वी ते बांधकाम परवानगी विभागात शहर अभियंता पदावर कार्यरत होते. तत्कालीन आयुक्त राजेश पाटील यांनी २६ मे २०२२ रोजी त्यांना शहर अभियंता पदोन्नती दिली होती. मागील साडेतीन वर्षांत त्यांनी महापालिकेतील विविध मोठ्या प्रकल्पांना मंजुरी देत महत्त्वाची भूमिका बजावली. ही अनेक कामे सध्या प्रगतीपथावर आहेत.
दरम्यान, महापालिकेत शहर अभियंता पदाच्या समकक्ष दोन मुख्य अभियंता पदे निर्माण करण्यात आली असून, त्यावर संजय कुलकर्णी आणि प्रमोद ओंभासे कार्यरत आहेत. या पार्श्वभूमीवर निकम यांनी अचानक स्वेच्छानिवृत्तीचा निर्णय घेतल्याने त्यामागील कारणांबाबत विविध तर्क-वितर्कांना ऊत आला आहे.
निकम यांच्या निवृत्तीच्या अर्जावर आयुक्त हर्डीकर यांचा अंतिम निर्णय अद्याप प्रतीक्षेत आहे.












