- “हा लढा प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी” — रविराज काळे…
मा. अशोक लोखंडे :- संपादक तथा प्रतिनिधी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी चिंचवड (दि. २९ डिसेंबर २०२५) :- आगामी महानगरपालिका निवडणुकीत आम आदमी पार्टीने प्रभाग क्रमांक २६ साठी अधिकृत उमेदवार म्हणून रविराज बबन काळे यांची निवड केली असून, त्यांनी आज अधिकृतरीत्या आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या प्रभाग क्षेत्रीय कार्यालयात सकाळी अर्ज सादर करण्यात आला. यावेळी पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि तरुण मोठ्या संख्येने उपस्थित होते. शांततापूर्ण आणि उत्साही वातावरणात अर्ज दाखल झाल्याचे पाहायला मिळाले.
अर्ज दाखल केल्यानंतर बोलताना रविराज काळे म्हणाले, “जनता हीच माझी ताकद आहे. प्रभागातील नागरिकांच्या दैनंदिन अडचणी, मूलभूत सुविधा आणि विकासाच्या प्रश्नांवर मी सातत्याने काम केले आहे. ही उमेदवारी केवळ निवडणुकीसाठी नसून प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी आहे.”
ते पुढे म्हणाले की, पक्षाच्या धोरणांनुसार पारदर्शक प्रशासन, भ्रष्टाचारमुक्त कारभार, स्वच्छ परिसर, महिला सक्षमीकरण, युवकांसाठी संधी आणि ज्येष्ठांच्या समस्या निराकरण हेच आपल्या कामाचे प्राधान्य राहील.
उमेदवारी अर्जाच्या वेळी उपस्थित पदाधिकाऱ्यांनी विश्वास व्यक्त केला की, प्रभाग क्रमांक २६ मधील नागरिकांचा पाठिंबा लक्षात घेता येणाऱ्या निवडणुकीत आम आदमी पार्टीला चांगले यश मिळेल. प्रभागातील रस्ते, पाणीपुरवठा, कचरा व्यवस्थापन, आरोग्य, शिक्षण आणि सार्वजनिक सुरक्षा या क्षेत्रांत ठोस काम करण्याची ग्वाही देण्यात आली.
रविराज बबन काळे हे आम आदमी पार्टीचे पिंपरी–चिंचवड शहराध्यक्ष असून, जनतेशी थेट संवाद आणि सातत्यपूर्ण कामामुळे त्यांची ओळख सेवाभावी नेतृत्व म्हणून झाली आहे.












