- ३६५ वाहनचालकांसह काळी काच वापरणाऱ्या १,१५६ वाहनांवर कारवाई…
मा. अशोक लोखंडे :- संपादक तथा प्रतिनिधी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी चिंचवड (दि. २९ डिसेंबर २०२५) :- मद्यप्राशन करून वाहन चालविण्यामुळे होणारे अपघात रोखण्यासाठी पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या वतीने विशेष मोहीम राबविण्यात आली. २० ते २८ डिसेंबरदरम्यान शहरातील विविध भागांत नाकाबंदी व तपासणी करण्यात येऊन मद्यधुंद अवस्थेत वाहन चालवणाऱ्या ३६५ वाहनचालकांवर कायदेशीर कारवाई करण्यात आली.
या कालावधीत वाहतूक शाखेने काळी काच लावलेल्या वाहनांवरही लक्ष केंद्रीत केले. एकूण १,१५६ वाहनांवर कारवाई करत १३ लाख ८४ हजार रुपयांचा दंड आकारण्यात आला. संबंधित चालकांविरुद्ध मोटार वाहन कायद्यानुसार पुढील कार्यवाही करण्यात येत असल्याची माहिती देण्यात आली.
मद्यप्राशन करून वाहन चालविणे हा गंभीर गुन्हा असून त्यामुळे अपघातांचा धोका वाढतो. नागरिकांनी वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करून स्वतःचा आणि इतरांचा जीव सुरक्षित ठेवावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. ड्रंक अॅण्ड ड्राइव्हविरोधातील ही विशेष मोहीम ३१ डिसेंबरपर्यंत सुरू राहणार आहे, अशी माहिती पोलिस उपायुक्त (वाहतूक) विवेक पाटील यांनी दिली.












