मा. अशोक लोखंडे :- संपादक तथा प्रतिनिधी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. ३० डिसेंबर २०२५) :- महापालिका निवडणुकीची रणधुमाळी चांगलीच रंगत असून, विविध पक्षांच्या उमेदवारांनी प्रभागनिहाय रॅली, मिरवणुका आणि पदयात्रांतून दमदार शक्तिप्रदर्शन केले. ढोल-ताशांच्या गजरात, समर्थकांच्या घोषणांनी दुमदुमलेल्या वातावरणात उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले.
सोमवार (दि. २९) रोजी एकूण ३२५ उमेदवारांकडून ६९६ अर्ज दाखल झाले. त्यामुळे सर्व आठ निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालय परिसरात कार्यकर्त्यांची प्रचंड गर्दी झाली होती. आज (मंगळवार, दि. ३०) अर्ज भरण्याचा अखेरचा दिवस असल्याने अधिक मोठी हालचाल दिसण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
मंगळवार (दि. २३) पासून अर्ज स्वीकारण्यास सुरुवात झाली. अखेरच्या टप्प्यात सोमवारी अनेक उमेदवारांनी परिवार, कार्यकर्ते आणि वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत अर्ज सादर केले. प्रभागातील प्रमुख रस्त्यांवरून काढलेल्या रॅलीत महिला-पुरुष, ज्येष्ठ नागरिक, तरुणाई आणि लहान मुलांचा उत्स्फूर्त सहभाग दिसून आला. तिरंगा किंवा केशरी फेटे, पक्षांचे मफलर व चिन्हे परिधान केलेले कार्यकर्ते मतदारांशी संवाद साधताना दिसत होते.
शक्तिप्रदर्शनामुळे काही ठिकाणी वाहतूक कोंडी निर्माण झाली. गर्दीवर नियंत्रण मिळवताना पोलिसांना कसरत करावी लागली. अनेक उमेदवारांनी मुख्य उमेदवारीसोबतच काळजी म्हणून घरातील सदस्य किंवा जवळच्या कार्यकर्त्यांच्या नावानेही अतिरिक्त अर्ज दाखल केले. महापालिकेच्या नोंदीनुसार, आतापर्यंत २,५२१ उमेदवारांकडून ५,९६१ अर्ज दाखल झाले आहेत. आज सकाळी ११ ते दुपारी ३ पर्यंत अर्ज स्वीकारले जाणार आहेत.
यानंतरची पुढील निवडणूक प्रक्रिया…
छाननी : बुधवार (दि. ३१)
वैध उमेदवारी यादी : छाननीनंतर प्रसिद्ध
उमेदवारी मागे घेण्याची मुदत : शुक्रवार (दि. २) — दुपारी ३ वाजेपर्यंत
चिन्ह वाटप व अंतिम यादी : शनिवार (दि. ३)
प्रचारकालावधी : १४ जानेवारीपर्यंत
मतदान : १५ जानेवारी












