- परिसरात दहशतीचे वातावरण; पोलीसांचा राहिला नाही धाक…
सुरज करांडे :- Crime रिपोर्टर…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. ३० डिसेंबर २०२५) :- रहाटणी परिसरात मध्यरात्री अज्ञात कारणावरून रिक्षा व दुचाकींना आग लावण्याच्या प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली. घटनेत रिक्षासह चार दुचाकी जळून खाक झाल्या असून, सुमारे ३ लाख १५ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. या प्रकरणी काळेवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणातील आरोपीचे नाव अभिषेक राजाराम श्रीनामे (वय २२, रा. रहाटणी) असे असून, फिर्यादी भगवान अशोक घनाते (वय ५३) यांनी दिली आहे. घनाते कुटुंबासह तुळजापूर देवदर्शनाहून परत आल्यानंतर घरासमोर उभी केलेली रिक्षा आणि शेजारील दुचाकींना मध्यरात्री पेट्रोल ओतून आग लावण्यात आल्याचे समोर आले आहे.
नागरिकांच्या मदतीने आणि अग्निशमन दलाच्या तत्पर कारवाईने आग आटोक्यात आणण्यात आली; मात्र तोपर्यंत सर्व वाहने जळून खाक झाली. सीसीटीव्ही फुटेजमध्ये आरोपी पेट्रोल ओतताना स्पष्ट दिसत असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली.
दरम्यान, महापालिका निवडणुका तोंडावर असताना शहरात कडेकोट सुरक्षा तैनात असल्याचा दावा पोलिसांकडून केला जातोय. नववर्षाच्या स्वागताच्या पार्श्वभूमीवर बंदोबस्त वाढवला असल्याचे सांगितले जात असतानाच घडलेल्या या घटनेमुळे पोलिसांच्या सज्जतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
तडीपार गुंडांच्या हालचाली, त्यात जाळपोळ आणि तोडफोडीचे प्रकार या पार्श्वभूमीवर नागरिकांत संताप आहे. “बंदोबस्त कागदावर गुन्हेगार रस्त्यावर!” अशी प्रतिक्रिया स्थानिकांकडून व्यक्त होत आहे. रात्रीच्या वेळी झालेली जाळपोळ ही केवळ मालमत्तेची हानी नसून नागरिकांच्या सुरक्षिततेवर थेट धोका असल्याचे मत व्यक्त केले जात आहे. पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे. या प्रकरणी कठोर आणि तात्काळ कारवाई करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.












