- नगरसेवक रवी लांडगे यांची महापौरपदी निवड निश्चित..
- तर, उपमहापौरपदी शीतल उर्फ विजय शिंदे यांचीही निवड निश्चित…
मा. अशोक लोखंडे :- संपादक तथा प्रतिनिधी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. ०२ फेब्रुवारी २०२६) :- पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या महापौर व उपमहापौर निवडणुकीत कोणताही विरोध न होता सत्तास्थापनेचा मार्ग मोकळा झाला आहे. भोसरी प्रभाग क्रमांक ६ चे बिनविरोध नगरसेवक रवी लांडगे यांची महापालिकेच्या महापौरपदी बिनविरोध निवड निश्चित झाली आहे.
तर, प्रभाग क्रमांक १९ मधील भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक शीतल उर्फ विजय गोरख शिंदे यांचीही उपमहापौरपदी बिनविरोध निवड निश्चित ठरली आहे.
या पंचवार्षिक कालावधीत प्रथमच भोसरी विधानसभा मतदारसंघाला महापौरपदाचा मान मिळाला असून, यामुळे परिसरात आनंदाचे वातावरण आहे. दोन्ही पदांसाठी इतर कोणताही उमेदवार रिंगणात नसल्याने ही निवड प्रक्रिया औपचारिक ठरली.
भारतीय जनता पक्ष चे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या आदेशानुसार ही निवड निश्चित करण्यात आली असल्याची माहिती पक्षाच्या सूत्रांनी दिली. महापालिकेत भाजपची सत्ता अधिक भक्कम होत असल्याचे या निवडीमुळे स्पष्ट झाले आहे.












