- त्यातच राष्ट्रवादीच्या वैशाली काळभोर यांचा उपमहापौरपदासाठी अर्ज दाखल..
- आता भाजप युतीधर्म निभावणार की निवडणूक होणार?…
मा. अशोक लोखंडे :- संपादक तथा प्रतिनिधी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. ०२ फेब्रुवारी २०२६) :- पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेतील सत्तासमीकरणात ऐनवेळी नाट्यमय वळण आले असून उपमहापौर पदाची निवडणूक चुरशीची ठरण्याची चिन्हे आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नगरसेविका वैशाली काळभोर यांनी उपमहापौरपदासाठी अधिकृत अर्ज दाखल केल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
दरम्यान, प्रभाग क्रमांक १९ मधील भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक शीतल उर्फ विजय गोरख शिंदे यांची भारतीय जनता पक्षाकडून उपमहापौरपदी निवड निश्चित करण्यात आली होती. मात्र, या निर्णयाबाबत ते नाराज असल्याची माहिती समोर येत असून त्यांनी अद्याप उपमहापौर पदासाठी अर्जही दाखल केलेला नाही, यामुळे संभ्रम वाढला आहे.
या पार्श्वभूमीवर आता दोन शक्यता पुढे येत आहेत. भाजपकडून ऐनवेळी दुसरा उमेदवार मैदानात उतरवला जाणार का, की स्व. अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादीशी युतीची भावना जपत उपमहापौरपद राष्ट्रवादीच्या नगरसेविकेला देण्यात येणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
उपमहापौर पदाच्या या निर्णयातून महापालिकेतील युतीचे भवितव्य आणि राजकीय दिशा स्पष्ट होणार असल्याचे राजकीय जाणकारांचे मत आहे.












