- शिवसेना जिल्हा संघटक संतोष सौंदणकर यांची प्रतिक्रिया…
मा. अशोक लोखंडे :- संपादक तथा प्रतिनिधी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. ०२ फेब्रुवारी २०२६) :- केंद्रीय अर्थसंकल्प २०२६-२७ हा विकसित भारताच्या दिशेने ठोस पावले टाकणारा, संतुलित आणि भविष्योन्मुख अर्थसंकल्प आहे. विकास, समावेशकता आणि संधींची समान वाटणी या तत्त्वांवर आधारित हा अर्थसंकल्प देशातील सर्व घटकांना बळ देणारा आहे. पायाभूत सुविधा, शहरी विकास आणि वाहतूक क्षेत्रासाठी करण्यात आलेल्या मोठ्या तरतुदींमुळे महाराष्ट्रासह देशाच्या आर्थिक वाढीस गती मिळणार आहे, अशी प्रतिक्रिया शिवसेना जिल्हा संघटक मा. संतोष सौंदणकर यांनी व्यक्त केली आहे.
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी आज रविवारी (दि. १) केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला. त्यावर प्रतिक्रिया देताना मा. सौंदणकर म्हणाले, या अर्थसंकल्पातून राज्यातील शेती, पशुपालन व मत्स्यव्यवसायासाठीच्या योजनांमुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेला नवी ऊर्जा मिळेल, तर महिला-केंद्रित उपक्रमांमुळे आर्थिक व सामाजिक सक्षमीकरणाला चालना मिळणार आहे. डिजिटल अर्थव्यवस्था, डेटा सेंटर्स, AI आणि नव्या तंत्रज्ञान क्षेत्रातील निर्णय भारताला जागतिक स्तरावर स्पर्धात्मक बनवतील. आरोग्य क्षेत्रातील सवलती सामान्य नागरिकांसाठी दिलासादायक ठरणार आहेत. एकूणच, हा अर्थसंकल्प रोजगारनिर्मिती, गुंतवणूक आणि सामाजिक सुरक्षिततेचा मजबूत पाया घालणारा असून देशाला आर्थिकदृष्ट्या अधिक सक्षम करण्याची क्षमता त्यात आहे.
पिंपरी-चिंचवडसारख्या वेगाने वाढणाऱ्या शहरांसाठी नियोजनबद्ध गुंतवणूक, कौशल्याधारित शिक्षण आणि रोजगाराभिमुख धोरणे ही काळाची गरज होती. अर्थसंकल्पातील तरतुदींमुळे स्थानिक तरुणांना शिक्षण, उद्योग आणि रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होतील. आधुनिक पायाभूत सुविधा, सुलभ कर्जव्यवस्था आणि सामाजिक न्यायावर आधारित योजनांमुळे शहराचा विकास अधिक समतोल व शाश्वत होईल. एकूणच, हा अर्थसंकल्प पिंपरी-चिंचवडला औद्योगिक, शैक्षणिक आणि सामाजिक प्रगतीच्या नव्या उंचीवर नेणारा ठरणार आहे, असेही, मा. सौंदणकर यांनी म्हटले आहे.












