- ऐनवेळी उमेदवार बदलावा लागल्याने भाजपवर नामुष्कीची वेळ..
- आता शिंदे नाहीत तर, नगरसेविका शर्मिला बाबर असतील उपमहापौरपदाच्या उमेदवार…
मा. अशोक लोखंडे :- संपादक तथा प्रतिनिधी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. ०२ फेब्रुवारी २०२६) :- पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या महापौर व उपमहापौर पदाच्या निवडणुकीदरम्यान भाजपमध्ये सर्व काही सुरळीत असल्याचा दावा प्रत्यक्षात फोल ठरल्याचे चित्र समोर आले आहे. भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक शीतल उर्फ विजय गोरख शिंदे यांनी उपमहापौरपद स्वीकारण्यास नकार दिल्याने ऐनवेळी पक्षाची चांगलीच धावपळ उडाली.
भाजपकडून आधीच भोसरी प्रभाग क्रमांक ६ चे नगरसेवक रवी लांडगे यांची महापौरपदी, तर विजय शिंदे यांची उपमहापौरपदी निवड निश्चित करण्यात आली होती. मात्र ऐनवेळी विजय शिंदे यांनी हे पद नाकारल्याने भाजपमध्येच अंतर्गत नाराजीची चर्चा सुरू झाली. पक्षाकडून नगरसेवक शिंदे यांची समजूत काढण्याचे प्रयत्न झाले, मात्र त्यात यश न आल्याने उपमहापौर पदासाठी पर्यायी उमेदवार शोधण्याची वेळ भाजपवर आली.
या गोंधळातच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नगरसेविका वैशाली काळभोर यांनी उपमहापौरपदासाठी अधिकृत अर्ज दाखल केल्याने भाजपसमोर उमेदवाराच्या नावाबाबत पेच निर्माण झाला आणि परिस्थिती अधिकच गुंतागुंतीची बनली. यामुळे क्षणभर भाजपची अडचण वाढली होती. अखेर पक्षाने नगरसेविका शर्मिला बाबर यांचे नाव उपमहापौरपदासाठी निश्चित केले. त्यांनी निवडणूक अधिकाऱ्यांकडे आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
या सर्व घडामोडीनंतर भाजपचे नवनियुक्त पक्षनेते प्रशांत शितोळे यांनी पत्रकार परिषद घेऊन परिस्थिती नियंत्रणात असल्याचा दावा केला. राजकारणात अशा घटना घडत असतात, नगरसेवक विजय शिंदे नाराज नाहीत, ते पक्षाचे ज्येष्ठ आणि तीनवेळा निवडून आलेले नगरसेवक आहेत. भविष्यात त्यांना योग्य संधी देण्याचा प्रयत्न केला जाईल, असे सांगत त्यांनी वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केला.
दरम्यान महापौर पदासाठी सर्वाधिक चर्चेत असणारे भाजपा शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे हे देखील या पत्रकार परिषदेला उपस्थित नसल्याने अंतगर्त गटबाजीच्या चर्चांना अधिकच बळ मिळाले आहे.
महापौर व उपमहापौर पदाच्या निवडीसाठी शुक्रवार, ६ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ११ वाजता महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीतील यशवंतराव चव्हाण सभागृहात विशेष सभा आयोजित करण्यात आली आहे. या सभेत उपमहापौरपदाची अंतिम निवड होणार असून, राष्ट्रवादीच्या वैशाली काळभोर अर्ज माघार घेतात की निवडणुकीला सामोरे जातात, याकडे आता संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.











