- राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर प्रशासकीय फेरबदलांना वेग…
मा. अशोक लोखंडे :- संपादक तथा प्रतिनिधी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. ३ फेब्रुवारी २०२६) :- पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेमध्ये सध्या सुरू असलेल्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर प्रशासकीय स्तरावरही हालचालींना वेग आला असून, उपायुक्त व सहाय्यक आयुक्तांच्या कामकाजात बदल करण्यात आले आहेत. विविध विभागांची जबाबदारी नव्याने वाटप करत महापालिकेच्या प्रशासनात फेरबदल करण्यात आले असल्याचे समोर आले आहे.
निवडणूक विभागाचे कामकाज पाहणारे उपयुक्त सचिव पवार यांच्याकडे आता कर संकलन विभागाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. याआधी त्यांनी महापालिका निवडणुकीचे कामकाज पार पाडले होते. आता कर संकलन विभागाची धुरा त्यांच्याकडे देण्यात आल्याने महसूलवाढीवर महापालिकेचे विशेष लक्ष राहणार असल्याचे संकेत मिळत आहेत.
उपायुक्त प्रदीप ठेगाळ यांच्याकडील नागरी सुविधा केंद्राचे कामकाज काढून घेण्यात आले आहे. मात्र, आरोग्य विभागाची जबाबदारी त्यांच्याकडे कायम ठेवण्यात आली असून, स्वच्छ भारत अभियानाच्या समन्वयकपदी त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे स्वच्छता व आरोग्य विषयक कामकाजावर लक्ष केंद्रित केले जाणार आहे.
सहाय्यक आयुक्त अमित पंडित यांच्याकडील माहिती व तंत्रज्ञान विभागाची जबाबदारी कायम ठेवण्यात आली असून, त्यांच्याकडे नागरी सुविधा केंद्राची अतिरिक्त जबाबदारी सोपविण्यात आली आहे. तर सहाय्यक आयुक्त किरणकुमार मोरे यांच्याकडे आरोग्य विभागातील आरोग्य कार्यकारी अधिकारी पदाची जबाबदारी देण्यात आली आहे.
दरम्यान, अमित पंडित यांच्याकडील आरोग्य कार्यकारी अधिकारी पदाचा अतिरिक्त पदभार काढून घेण्यात आला आहे. या फेरबदलांमुळे महापालिकेतील विभागीय कामकाज अधिक गतिमान व परिणामकारक होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.












