- भोसरी, पिंपरी व चिंचवड मतदारसंघातील नगरसेवकांचे जोरदार लॉबिंग…
मा. अशोक लोखंडे :- संपादक तथा प्रतिनिधी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. ३ फेब्रुवारी २०२६) :- पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेतील सत्तासंरचनेचे चित्र जवळपास स्पष्ट झाले असले, तरी महापालिकेच्या सर्वात महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या स्थायी समिती अध्यक्षपदावर नेमकी कोणाची वर्णी लागणार, याबाबत अद्यापही अनिश्चितता कायम आहे. आर्थिक निर्णयांमध्ये मोलाची भूमिका बजावणाऱ्या या पदासाठी राजकीय हालचालींना वेग आला असून, अंतर्गत पातळीवर जोरदार चर्चा सुरू आहेत.
महापालिकेतील सत्ताधारी पक्षाची जबाबदारी चिंचवड विधानसभा मतदारसंघातील नेतृत्वाकडे असल्याने, स्थायी समिती अध्यक्षपदावरही याच मतदारसंघाचा दावा अधिक मजबूत मानला जात आहे. दरम्यान, महापौर व उपमहापौर पदासाठी अर्ज दाखल करणाऱ्यांमुळे राजकीय समीकरणे अधिक गुंतागुंतीची झाली आहेत.
महापौर पदासाठी अर्ज दाखल केलेल्या रवी लांडगे हे भोसरी विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात, तर उपमहापौर पदासाठी इच्छुक असलेल्या शर्मिला बाबर या पिंपरी विधानसभा मतदारसंघातून येतात. त्यामुळे भोसरी, पिंपरी आणि चिंचवड या तिन्ही विधानसभा मतदारसंघांना प्रत्येकी एक महत्त्वाचे पद मिळण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे.
या पार्श्वभूमीवर आता स्थायी समिती अध्यक्षपद नेमके कोणत्या मतदारसंघाच्या वाट्याला जाणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. शहराच्या विकासकामांसाठी निधी मंजुरी, खर्चाचे नियोजन आणि धोरणात्मक निर्णय या समितीमार्फत घेतले जात असल्याने या पदाला विशेष महत्त्व आहे.
आगामी काळात महापालिकेच्या विकासाची दिशा ठरविणाऱ्या या अध्यक्षपदासाठी सत्ताधारी पक्षातच अंतर्गत चाचपणी सुरू असून, अंतिम निर्णय जाहीर होईपर्यंत राजकीय चर्चांना आणखी उधाण येण्याची शक्यता आहे. त्यामुळे या निवडीकडे केवळ राजकीय वर्तुळच नव्हे, तर सामान्य नागरिकांचेही लक्ष लागले आहे.












