मा. अशोक लोखंडे :- संपादक तथा प्रतिनिधी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. ३ फेब्रुवारी २०२६) :- चऱ्होली परिसरात माहिती तंत्रज्ञान (आयटी) क्षेत्रात कार्यरत असलेल्या एका तरुण कर्मचाऱ्याने विष प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, संबंधित प्रकरणाचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.
कुमार ऐश्वर्य (वय ३२, रा. चऱ्होली बुद्रुक) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कुमार ऐश्वर्य हे खराडी येथील एका खासगी आयटी कंपनीत नोकरीला होते. त्यांनी २९ जानेवारी रोजी विष प्राशन केल्यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचार सुरू असतानाच त्यांचा मृत्यू झाला.
पोलिस तपासात समोर आलेल्या प्राथमिक माहितीनुसार, वैयक्तिक कारणांमुळे कुमार ऐश्वर्य तणावाखाली होते. नैराश्यातूनच त्यांनी टोकाचे पाऊल उचलल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.
घटनेची माहिती मिळताच चऱ्होली पोलीस ठाण्याचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. पोलिस निरीक्षक विनायक पाटील यांनी सांगितले की, आत्महत्येचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. संबंधित व्यक्तींचे जबाब नोंदविण्यात येत असून, सर्व बाजूंनी तपास केला जात आहे.
दरम्यान, आयटी क्षेत्रातील कामाचा ताण, वैयक्तिक अडचणी आणि मानसिक तणाव यामुळे तरुणांमध्ये वाढणारी अस्वस्थता पुन्हा एकदा या घटनेमुळे अधोरेखित झाली आहे.












