- रहिवाशांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर..
- प्रशासनाकडे वारंवार तक्रारी करूनही तोडगा निघेना…
मा. अशोक लोखंडे :- संपादक तथा प्रतिनिधी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी चिंचवड (दि. ०५ फेब्रुवारी २०२६) :- पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या नियोजनानुसार चिखलीतील उद्यान व क्रीडांगणासाठी राखीव असलेला भूखंड सध्या कचरा व बांधकाम साहित्य टाकण्याचे डंपिंग ग्राउंड बनल्याने स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. चिखली परिसरातील रोहिदास उद्यानलगत असलेल्या सुमारे १९९३/७ या आरक्षित भूखंडाचा विकास आराखड्यात उद्यानासाठी समावेश असताना, प्रत्यक्षात त्या जागेचा वापर अनधिकृतपणे कचरा टाकण्यासाठी केला जात असल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे.
या भागात राडारोडा, प्लास्टिक तसेच बांधकामातील अवशेष मोठ्या प्रमाणात टाकले जात असून त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरत आहे. पावसाळ्यात या ठिकाणी पाणी साचून डासांची पैदास वाढत असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. अनेक वेळा स्थानिक नागरिकांनी तसेच लोकप्रतिनिधींनी महापालिका प्रशासनाकडे पत्रव्यवहार करून या समस्येकडे लक्ष वेधले आहे. मात्र अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. दरम्यान, आरक्षित भूखंडावरील अतिक्रमण व कचऱ्यामुळे परिसरातील रहिवाशांमध्ये नाराजी वाढत असून, प्रशासनाने लवकर निर्णय न घेतल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे.
“चिखली परिसरातील खेळाडूंसाठी हा भूखंड एकमेव आधार होता. मात्र महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने येथे कचरा व राडारोडा टाकून खेळाडूंच्या भविष्यास अडथळा निर्माण केला आहे. आम्ही वारंवार पाठपुरावा करूनही प्रशासन सुस्त आहे. तातडीने हा भूखंड स्वच्छ करून खेळाडू आणि नागरिकांसाठी उपलब्ध करून द्यावा, अन्यथा आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल.”
– विकास साने, नवनिर्वाचित नगरसेवक पिं. चिं. मनपा…“याबाबत लवकरात लवकर माहिती घेऊन संबंधित विभागाकडून पाहणी केली जाईल. नियमांचे उल्लंघन झाल्यास तातडीने योग्य ती कारवाई केली जाईल. नागरिकांच्या हिताशी तडजोड केली जाणार नाही.”
– श्रावण हर्डीकर, महापालिका आयुक्त…












