- महापौर निवडीनंतर नगरसेवकांना आढावा बैठक घेता येईल?…
संतोष जराड, प्रतिनिधी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी चिंचवड (दि. ०५ फेब्रुवारी २०२६) :-पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज विचार प्रबोधन पर्व २०२६ च्या अनुषंगाने नियोजन बैठक नुकतीच पार पडली. मात्र ही बैठक नवनिर्वाचित नगरसेवकांच्या अनुपस्थितीत झाल्याने विविध वैचारिक सूचनांना मुकावे लागल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
दरम्यान शुक्रवारी (दि. ६) महापौरांची निवड होऊन महापालिकेतील प्रशासकीय राजवट संपुष्टात येत नगरसेवकांच्या नेतृत्वाखाली कारभार सुरू होणार होता. त्यानंतर बैठक झाली असती तर नव्या नगरसेवकांकडून विविध सूचना व नियोजनात अधिक समन्वय साधता आला असता, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
महापालिकेतील दिवंगत माजी महापौर मधुकर पवळे सभागृहात आयोजित या बैठकीत अतिरिक्त आयुक्त विक्रांत बगाडे यांनी मार्गदर्शन केले. छत्रपती शिवाजी महाराज विचार प्रबोधन पर्व अधिक नियोजनबद्ध, प्रभावी आणि नागरिकांच्या व्यापक सहभागातून राबविण्यासाठी महापालिका प्रशासन सकारात्मक असून आवश्यक त्या सर्व सुविधा व समन्वय उपलब्ध करून दिला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
या बैठकीस सह शहर अभियंता मनोज सेटिया, उप आयुक्त अण्णा बोदडे, ममता शिंदे, क्षेत्रीय अधिकारी किशोर ननवरे, कार्यकारी अभियंता सतीश वाघमारे, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक यांच्यासह विविध सामाजिक संस्थांचे पदाधिकारी व शिवजयंती उत्सव समित्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
बैठकीदरम्यान छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवन व कार्यावर आधारित विविध स्पर्धा, भव्य महानाट्य आयोजन, तसेच विद्यार्थ्यांसाठी पोवाडे, निबंध व वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्याच्या सूचना मांडण्यात आल्या. तसेच भक्ती-शक्ती समूहशिल्प परिसराची स्वच्छता, विद्युत रोषणाई, एलईडी स्क्रीनद्वारे इतिहास दर्शन, कार्यक्रमस्थळी स्वच्छतागृह, पार्किंग व सुरक्षा व्यवस्था करण्याबाबतही मागण्या करण्यात आल्या.
दरम्यान, प्रबोधन पर्वाच्या नियोजनासाठी दरवर्षी फेब्रुवारीऐवजी जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात बैठक घेण्याची सूचनाही उपस्थितांनी केली. मात्र नवनिर्वाचित नगरसेवकांच्या सहभागाशिवाय बैठक पार पडल्याने नियोजनात त्यांच्या सूचना व सहभागाचा अभाव राहिल्याची चर्चा सुरू असून महापौर निवडीनंतर या विषयावर नव्याने आढावा घेतला जाईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.












