- १२ धोकादायक गुन्हेगारांवर एमपीडीए तर, ४६ सराईत हद्दपार…
न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. ७ फेब्रुवारी २०२६) :- पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालयाने शहरातील वाढत्या गुन्हेगारीवर आळा घालण्यासाठी मोठी कारवाई करत १२ धोकादायक गुन्हेगारांवर एमपीडीए (महाराष्ट्र प्रतिबंधक गुन्हेगारी कायदा) अंतर्गत स्थानबद्धतेची कारवाई केली आहे. तसेच जानेवारी महिन्यात विविध परिमंडळांत एकूण ४६ सराईत गुन्हेगारांवर हद्दपारीचे आदेश लागू करण्यात आले आहेत.
पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांच्या मार्गदर्शनाखाली खून, खुनाचा प्रयत्न, जबरी चोरी, दरोडे, अपहरण, महिलांवरील अत्याचार आणि बेकायदेशीर शस्त्र बाळगणे अशा गंभीर गुन्ह्यांमध्ये सक्रिय असलेल्या गुन्हेगारांवर कारवाई करण्यात आली. चाकण उत्तर व उत्तर महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यांच्या हद्दीत कार्यरत असलेल्या दोन कुख्यात गुन्हेगारांना एमपीडीए अंतर्गत ताब्यात घेण्यात आले असून त्यांना कारागृहात ठेवण्यात आले आहे.
याशिवाय पोलिसांनी जानेवारी महिन्यात सराईत गुन्हेगारांविरोधात मोठी मोहीम राबवली. परिमंडळ एकमध्ये १०, परिमंडळ दोनमध्ये ९, परिमंडळ तीनमध्ये १७ आणि परिमंडळ चारमध्ये ११ अशा एकूण ४६ गुन्हेगारांना हद्दपार करण्यात आले. संबंधित गुन्हेगारांवर महाराष्ट्र पोलीस अधिनियमातील कलम ५५, ५६ व ५७ नुसार ही कारवाई करण्यात आली आहे.
पोलिसांनी हद्दपार केलेले अनेक गुन्हेगार हे २० ते ४० वयोगटातील असून त्यांच्या हालचालींवर विशेष लक्ष ठेवण्यात येत आहे. हद्दपार कालावधीत संबंधित गुन्हेगार पुणे जिल्ह्यात आढळल्यास तातडीने नियंत्रण कक्ष किंवा जवळच्या पोलीस ठाण्याशी संपर्क साधण्याचे आवाहन पोलिसांनी नागरिकांना केले आहे.
या कारवायांमुळे शहरातील गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवण्यास मदत होणार असून भविष्यातही अशाच प्रतिबंधात्मक कारवाया सुरू ठेवण्यात येणार असल्याची माहिती पोलिस प्रशासनाने दिली आहे.











