- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त मोरया गोसावी मंदिरात दिर्घायुष्यासाठी अभिषेक व पुजा..
- अजितदादांच्या दु:खद निधनामुळे वाढदिवसाच्या कार्यक्रमांना बगल…
मा. अशोक लोखंडे :- संपादक तथा प्रतिनिधी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
चिंचवडगाव (दि. ०८ फेब्रुवारी २०२६) :- राज्याचे उपमुख्यमंत्री तथा शिवसेनेचे प्रमुख एकनाथ शिंदे यांचा सोमवारी वाढदिवस आहे. मात्र महायुतीतील घटक पक्ष राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व राज्याचे तत्कालीन उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांच्या अकाली अपघाती निधनाच्या पार्श्वभूमीवर शिंदे यांनी आपला वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे. महायुती हा परिवार असून घरात दुःखाचे वातावरण असताना कोणताही आनंदोत्सव साजरा करू नये, वाढदिवस येत-जात राहतात, असे आवाहन त्यांनी शिवसैनिकांना केले आहे.

शिंदे यांच्या या आवाहनाला प्रतिसाद देत पिंपरी-चिंचवड शहर शिवसेनेच्या वतीने खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांच्या मार्गदर्शनाखाली चिंचवडगाव येथील मोरया गोसावी मंदिरात धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. मंदिरात श्रींच्या चरणी अभिषेक पूजा, आरती व मंत्रोच्चार करण्यात आले. यावेळी एकनाथ शिंदे यांना निरोगी व दीर्घायुष्य लाभावे यासाठी प्रार्थना करण्यात आली.
या धार्मिक कार्यक्रमाला शिवसेना उपनेत्या तथा नगरसेविका सुलभा उबाळे, शिवसेनेचे जिल्हा समन्वयक बाळासाहेब वाल्हेकर, जिल्हा संघटक संतोष सौंदणकर, जिल्हा संघटिका शैलाताई भोंडवे, विभाग संघटिका भारती चकवे, उपशहर संघटिका शशिकला उभे, शाखा संघटीका नयना पारखे, विभाग संघटिका संगिता टुपके, केशव सरोदे, शिवा ओंकार, गणेश धननाईक, ओम परदेशी आणि शिवसैनिक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी शिवसेना उपनेत्या सुलभा उबाळे म्हणाल्या की, “एकनाथ शिंदे यांनी राजकारणात संवेदनशील नेतृत्वाचे उदाहरण घालून दिले आहे. वैयक्तिक आनंदापेक्षा सहकाऱ्यांच्या दुःखात सहभागी होण्याची त्यांची भूमिका ही शिवसेनेच्या संस्कारांची ओळख आहे. त्यांच्या नेतृत्वामुळे सर्वसामान्यांना न्याय मिळत असून ते राज्याच्या विकासासाठी सातत्याने कार्यरत आहेत.”
जिल्हा समन्वयक बाळासाहेब वाल्हेकर म्हणाले की, “शिंदेसाहेब हे कार्यकर्त्यांच्या सुख-दुःखात नेहमी सहभागी होणारे नेतृत्व आहे. त्यांनी घेतलेला साधेपणाचा निर्णय हा समाजासाठी आदर्श आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना अधिक बळकट होईल, असा विश्वास आहे.”
संतोष सौंदणकर यांनी सांगितले की, “ उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनामुळे अनेक विकासकामांना गती मिळाली आहे. त्यांच्या दीर्घायुष्य आणि उत्तम आरोग्यासाठी आज मोरया गोसावी मंदिरात प्रार्थना करण्यात आली असून शिवसैनिक त्यांच्या पाठीशी कायम राहतील.”












