न्यूज पीसीएमसी नेटवर्क
भोसरी (दि. ०८ फेब्रुवारी २०२६) :- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची झाडे लावण्याच्ये टेंडर मिळवून देण्याच्या आमिषाने ११ लाख ६९ हजार रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याचा प्रकार भोसरी परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत संदेश नंदकुमार लांडगे (वय ३२, रा. भोसरी) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अभिजीत संतोष गायकवाड (रा. दिघी रोड, भोसरी, पुणे) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हा प्रकार २० ऑक्टोबर २०२४ ते १४ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत फिर्यादी यांच्या राहत्या घरी तसेच इतर ठिकाणी घडला.
आरोपीने फिर्यादी यांना पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे झाडे लावण्याचे टेंडर मिळवून देण्याचे आमिष दाखवले. त्यासाठी रोख तसेच ऑनलाईन स्वरूपात एकूण १७ लाख ४९ हजार रुपये घेतले. त्यापैकी केवळ ५ लाख ८८ हजार रुपये परत करून उर्वरित रक्कम न देता आरोपीने टेंडर मिळाल्याचे खोटे सांगत बनावट कागदपत्रे देऊन फिर्यादी यांचा विश्वास संपादन केला.
या प्रकारामुळे फिर्यादी यांची एकूण ११ लाख ६९ हजार रुपयांची फसवणूक झाली आहे. याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पाटील करीत आहेत.












