- तनु भानने पटकावला देशपातळीवर ‘बेस्ट कॅडेट’ किताब…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. ८ फेब्रुवारी २०२६) :- प्रजासत्ताक दिनानंतर दिल्लीतील कॅरिअप्पा परेड ग्राउंड येथे पार पडलेल्या एनसीसी रॅलीमध्ये महाराष्ट्र संचालनालयाची ज्युनिअर अंडर ऑफिसर तनु भान हिने आर्मी विंग (सीनियर विंग) मधून देशातील सर्वोच्च ‘बेस्ट कॅडेट’ हा मानाचा किताब पटकावला.
शिस्त, नेतृत्व, शारीरिक क्षमता, आत्मविश्वास आणि राष्ट्रसेवेच्या निकषांवर उत्कृष्ट कामगिरी करत तिने हा सन्मान मिळवला.
या यशाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते तनु भान हिला सुवर्णपदक आणि मानाची ‘केन’ प्रदान करण्यात आली. पिंपळे सौदागर येथील रहिवासी असलेल्या तनुच्या या यशामुळे पिंपरी-चिंचवड शहरासह महाराष्ट्राचे नाव देशपातळीवर अधोरेखित झाले आहे.
पिंपरी-चिंचवड भाजप शहराध्यक्ष तथा नगरसेवक शत्रुघ्न (बापू) काटे यांनी तनु व तिच्या कुटुंबीयांचा सत्कार करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
तनु भान हिचे यश महिलाशक्ती, जिद्द व नेतृत्वाचे प्रतीक असून राष्ट्रसेवेत मुली कोणत्याही बाबतीत कमी नाहीत, असा प्रेरणादायी संदेश तिच्या कर्तृत्वातून मिळाल्याचे काटे यांनी सांगितले.
यावेळी विनोद पाटील व अन्य मान्यवर उपस्थित होते.












