- फळ खाताना औषधासारखी चव; तज्ञांकडून धोक्याचा इशारा…
मा. अशोक लोखंडे :- संपादक तथा प्रतिनिधी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ८ फेब्रुवारी २०२६) :- पिंपरी परिसरात औषधांचा वापर करून कृत्रिमरित्या पिकविलेल्या खरबुजांची विक्री होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

काळेवाडी येथील एका गृहिणीने पिंपरी मार्केटमधून दोन किलो खरबूज खरेदी केले. हे फळ घरी नेऊन कापल्यानंतर खाताना औषधासारखी चव जाणवल्याने त्यांनी ते खाणे टाळले. परिणामी संपूर्ण फळ कचर्यात टाकावे लागल्याची माहिती त्यांनी दिली.
या प्रकाराबाबत अॅक्युप्रेशर उपचार तज्ञ नीलिमा मोरे यांनी गंभीर इशारा दिला आहे. त्यांच्या मते, काही व्यापारी फळे लवकर मोठी दिसावीत व विक्री वाढावी यासाठी इंजेक्शन किंवा रासायनिक औषधांचा वापर करतात. अशा प्रकारे पिकविलेली फळे खाल्ल्यास किडनी, लिव्हर संबंधित विकार, शरीरातील फॅटी अॅसिड वाढणे, वजन वाढणे, हृदयविकार तसेच कर्करोगाचा धोका निर्माण होऊ शकतो, असे त्यांनी सांगितले.
नागरिकांनी फळ खरेदी करताना रंग, वास व चव तपासूनच खरेदी करावी, तसेच संशयास्पद फळांबाबत अन्न व औषध प्रशासनाकडे तक्रार करण्याचे आवाहन तज्ञांकडून करण्यात आले आहे. या प्रकारामुळे नागरिकांच्या आरोग्याबाबत चिंता व्यक्त होत असून संबंधित यंत्रणांनी बाजारपेठेत तपासणी मोहीम राबविण्याची मागणी होत आहे.











