- आधी आमदार निधीतून उखडपट्टी; मग पुन्हा काय बिनसलं?..
- कामाची चौकशी का होत नाही? हाच का पारदर्शक कारभाराचा नमुना…
मा. अशोक लोखंडे : संपादक तथा प्रतिनिधी...
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
चिंचवडगाव (दि. ९ फेब्रुवारी २०२६) :- चिंचवडगाव-बिजलीनगर मुख्य रस्ता परिसरातील हनुमान मंदिराजवळील पदपथ (Footpath) पुन्हा उखडण्यात आल्याने नागरिकांमधून नाराजी व्यक्त होत आहे. अवघ्या काही महिन्यांपूर्वी एका विधानपरिषद आमदाराच्या निधीतून सुस्थितीत असलेला पदपथ उखडून नव्याने बसविण्यात आला होता. मात्र, आता पुन्हा त्याच पदपथाचे काम हाती घेण्यात आल्याने स्थानिक नागरिकांनी प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

दरम्यान काही महिन्यांपूर्वी करण्यात आलेले पदपथाचे काम व्यवस्थित व वापरयोग्य होते. तरीही पुन्हा तेच पदपथ (Footpath) उखडून नव्याने बसविण्याचा घाट घालण्यात आला असल्याने हे काम केवळ टक्केवारीसाठी सुरू आहे की काय? असा सवाल स्थानिकांकडून उपस्थित केला जात आहे. वारंवार एकाच ठिकाणी कामे करून सार्वजनिक निधी वाया घालवला जात असल्याने प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
दरम्यान, संबंधित विभागाकडून या कामाबाबत अद्याप अधिकृत स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही. नागरिकांनी मात्र, अशा प्रकारच्या कामांची चौकशी करून जबाबदारांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.












