- शोककाळातही अभिनंदनचे फलक लागल्याने अजितदादा प्रेमी नाराज…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
चिंचवडगाव (दि. ९ फेब्रुवारी २०२६) :- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगरसेवक भाऊसाहेब भोईर यांची विरोधी पक्षनेतेपदी निवड झाल्याबद्दल राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाकडून शहरात त्यांचे हार्दिक अभिनंदनाचे फलक लावण्यात आले आहेत. त्यात गैर काहीही नसले तरी, ही वेळ मात्र, पक्षाच्या दृष्टीने अत्यंत दुःखद घटनेची आहे. त्यांचे नेते, मार्गदर्शक आणि शहराचे भाग्यविधाते अजितदादा पवार यांच्या अकाली जाण्याने पक्षात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.
‘अरे मग अभिनंदन कसले करताय? इथं पक्षाचा ढाण्या वाघ गेलाय’. शोककाळातही शहरात अभिनंदनचे फलक लागल्याने अजितदादा प्रेमी नाराज झाले आहेत. समयसूचकता आणि त्याचे भान विसरलेली शहर राष्ट्रवादी आता खरच संवेदनशून्य झाली आहे का? असा सवाल राजकीय जाणकार आणि अजितदादा प्रेमी उपस्थित करू पाहत आहेत.
राज्यातील प्रमुख नेते, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तसेच महायुती आणि विरोधी पक्षातील विविध पदाधिकारी दिवंगत नेते अजितदादा यांच्या अकाली निधनामुळे शोक व्यक्त करताना दिसत आहेत. अनेक ठिकाणी वाढदिवस, उत्सव आणि सार्वजनिक कार्यक्रम रद्द किंवा साध्या पद्धतीने साजरे करण्यात येत आहेत. अशा पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड शहरातील राष्ट्रवादी काँग्रेसकडून अभिनंदनाचे फलक लावले जाणे नागरिकांच्या भावना दुखावणारे असल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.
राजकीय जाणकारांच्या मते, अजितदादा हे राष्ट्रवादी काँग्रेससाठी महत्त्वाचे नेतृत्व होते. त्यांच्या निधनानंतर अपेक्षित शोकसंवेदना आणि संयमित भूमिका घेण्याऐवजी स्थानिक पातळीवर अभिनंदनाचे प्रदर्शन करण्यात आले, यामुळे पक्षाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. काही नागरिकांनीही “शहर राष्ट्रवादीला अजितदादांच्या जाण्याचे दु:ख नाही काय?” असा थेट सवाल उपस्थित केला आहे.
दरम्यान, या फलकाबाबत आमच्या प्रतिनिधीने शहराध्यक्ष योगेश बहल यांच्याशी संपर्क साधला असता तो होऊ शकला नाही. या प्रकारामुळे पक्षाच्या प्रतिमेला धक्का बसण्याची शक्यता व्यक्त होत असून, पक्षाने याबाबत भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.












