- अनेक प्रकल्प अर्धवट; कोट्यवधी खर्चूनही अपेक्षित सुविधा कागदावरच..
- प्रकल्प रद्द करून महापालिकेच्या माथी मारण्याचा प्रयत्न?…
मा. अशोक लोखंडे :- संपादक तथा प्रतिनिधी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी चिंचवड (दि. १० फेब्रुवारी २०२६) :- पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत राबविण्यात आलेले अनेक प्रकल्प अद्याप अपूर्ण किंवा अर्धवट अवस्थेत असल्याचे स्पष्ट झाले आहे. मार्च महिन्यात हे सर्व प्रकल्प महापालिकेकडे हस्तांतरित करण्याचा निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती मिळतेय. त्यामुळे अपूर्ण कामांचा भार थेट महापालिकेवर पडणार असल्याने नागरिकांकडून चिंता व्यक्त केली जात आहे.
स्मार्ट सिटी अंतर्गत पर्यावरण, वाहतूक, पाणीपुरवठा, सुरक्षा आणि डिजिटल सेवा यासाठी विविध प्रकल्प सुरू करण्यात आले. मात्र, अनेक ठिकाणी कामांची गती मंदावली असून, काही प्रकल्पांना वारंवार मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे “स्मार्ट” सुविधा प्रत्यक्षात नागरिकांपर्यंत पोहोचण्यात अपयशी ठरल्या असल्याची कारभारावर टीका होत आहे.
विशेष म्हणजे, मोठा आर्थिक खर्च होऊनही अनेक प्रकल्प केवळ प्राथमिक अवस्थेत किंवा अंशतः सुरू आहेत. काही प्रकल्पांची देखभाल व्यवस्था स्पष्ट नसल्याने भविष्यात त्यांचा उपयोग कितपत होईल, याबाबतही प्रश्न उपस्थित होत आहेत.
या प्रकल्पांवर कोट्यवधी रुपयांचा खर्च झाल्याचे सांगितले जात असले, तरी अनेक ठिकाणी प्रकल्पांचा अपेक्षित दर्जा आणि परिणाम दिसून येत नाही. स्मार्ट सिटी कंपनी बंद करण्याचा निर्णय घेतल्यास, अपूर्ण कामे, देखभाल खर्च आणि तांत्रिक जबाबदाऱ्या महापालिकेवर येणार आहेत. दरम्यान, नागरिकांच्या दृष्टीने अत्यावश्यक असलेल्या सुविधा पूर्ण क्षमतेने सुरू होण्याऐवजी प्रशासनिक निर्णयांमध्येच अडकून पडल्याने, स्मार्ट सिटी संकल्पनेच्या मूळ उद्देशालाच हरताळ फासला गेल्याची चर्चा शहरात सुरू आहे.
स्मार्ट सिटीतील रखडलेले / अर्धवट प्रकल्प…
- पर्यावरण सेन्सर प्रकल्प
- स्मार्ट ट्रॅफिक व्यवस्थापन प्रणाली
- सिटी सर्व्हेलन्स (सीसीटीव्ही) प्रकल्प
- स्मार्ट पार्किंग योजना
- स्मार्ट वॉटर सप्लाय प्रकल्प
- ऑटोमॅटिक फायर केबल प्रणाली
- स्मार्ट वॉटर स्प्लॅश फाउंटन
- पब्लिक वायफाय हॉटस्पॉट्स
- स्मार्ट गार्डन
- इंटिग्रेटेड कंट्रोल अँड कमांड सेंटर
- जीआयएस चॅनल व ईआरपी सिस्टीम
- स्मार्ट टॉयलेट्स व ई-पीडी सुविधा












