सुरज करांडे, प्रतिनिधी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
हिंजवडी (दि. १० फेब्रुवारी २०२६) :- इम्पोर्ट-एक्सपोर्ट व रिअल इस्टेट व्यवसायात गुंतवणूक करून मोठा नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवत एका शेतकऱ्याची तब्बल ६६ लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी हिंजवडी पोलिस ठाण्यात तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी मारूती बबन सावंत (वय ४०, व्यवसाय शेती, रा. भोईरवाडी, माण, ता. मुळशी, जि. पुणे) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार गणेश प्रकाश बारणे (रा. जय भवानी नगर, थेरगाव), ज्ञानेश अनिल शिंदे (रा. पाषाण, पुणे) व भरत परशुराम बानखेले (रा. मंचर, ता. आंबेगाव, जि. पुणे) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जानेवारी २०२१ पूर्वी चार महिन्यांपासून ते २ जुलै २०२२ दरम्यान हिंजवडी, औंध व बाणेर परिसरात आरोपींनी फिर्यादीचा विश्वास संपादन केला. त्यानंतर इम्पोर्ट-एक्सपोर्ट तसेच रिअल इस्टेट व्यवसाय सुरू करण्यासाठी गुंतवणूक करण्यास भाग पाडले. व्यवसायासाठी पैसे नसतानाही फिर्यादी यांच्या प्लॉटवर बँकेचे कर्ज काढून तसेच आरटीजीएस, धनादेश व रोख स्वरूपात एकूण ६६ लाख रुपये घेतल्याचा आरोप आहे.
आरोपींनी व्यवसाय सुरू न करता फिर्यादी यांना कोणताही आर्थिक फायदा दिला नाही तसेच मूळ रक्कम परत केली नाही. फिर्यादी यांनी पैशांची मागणी केल्यानंतर आरोपींनी धमकी दिल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक कांदे करीत आहेत.












