- प्रत्यक्षात शहरात राजरोसपणे अनधिकृत बांधकामांची चलती…
संतोष जराड, प्रतिनिधी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी चिंचवड (दि. १० फेब्रुवारी २०२६) :- पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणूक कालावधीत शहरात अतिक्रमणविरोधी कारवाई सुरू असल्याचा दावा प्रशासनाकडून करण्यात येत असला, तरी प्रत्यक्षात शहराच्या विविध भागांमध्ये दररोज नवनवीन अनधिकृत घरे, दुकाने व टपऱ्या उभ्या राहत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे ही कारवाई केवळ निवडणूक काळापुरती मर्यादित असून ती वरवरची असल्याची तीव्र टीका नागरिकांकडून होत आहे.
महापालिकेच्या आठही क्षेत्रीय कार्यालयांमार्फत कारवाई केल्याचे जाहीर केले जात असले, तरी शहराच्या कडेला, मोकळ्या जागांवर, पदपथांवर आणि नाल्यांच्या परिसरात बेकायदा बांधकामे सातत्याने उभे राहताना दिसत आहेत. विशेष म्हणजे ही बांधकामे काही दिवसांतच पूर्ण होत असताना, संबंधित विभागांकडून वेळेवर कारवाई होत नसल्याचे वास्तव आहे.
अनधिकृत घरे उभारली जात असताना स्थानिक अधिकारी, अतिक्रमण विभाग आणि क्षेत्रीय कार्यालयांचे कर्मचारी नेमके काय करतात? कारवाई जर इतकी प्रभावी आहे, तर मग दररोज नवीन अतिक्रमणे कशी उभी राहतात, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
कारवाई प्रामुख्याने फलक, हातगाड्या किंवा किरकोळ अतिक्रमणांपुरती मर्यादित ठेवली जाते, मात्र मोठ्या अनधिकृत बांधकामांकडे वारंवार कानाडोळा केला जात असल्याचा आरोप होत आहे. यामुळे नियमात बसून घरं बांधणाऱ्या नागरिकांमध्ये असंतोष वाढत असून, नेहमी नियम मोडणाऱ्यांनाच मोकळीक का? असा सवाल उपस्थित केला जात आहे.
महापालिकेने भविष्यात कठोर कारवाईचा इशारा दिला असला, तरी प्रत्यक्ष अंमलबजावणीवरच नागरिकांचा विश्वास उरलेला नाही. जोपर्यंत सातत्याने आणि निष्पक्ष कारवाई होत नाही, तोपर्यंत शहरातील अनधिकृत बांधकामांचा प्रश्न सुटणार नाही, अशी स्पष्ट भूमिका नागरिकांकडून मांडली जात आहे.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या हद्दीत सार्वत्रिक निवडणूक २०२५–२६ च्या कालावधीपासून आतापर्यंत आठही क्षेत्रीय कार्यालयांमार्फत एकूण १४३ अनाधिकृत बांधकामे, १ हजार २६० फ्लेक्स, १३ हजार ९७ केऑक्स, ११५ हातगाड्या, ६० टपर्या तसेच २ हजार ९९५ टेबल, वजन काटे, खुर्च्या, बाकडे, झेंडे व इतर साहित्य हटविण्यात व जप्त करण्यात आले आहे. – अतुल पाटील, सहाय्यक आयुक्त अतिक्रमण विभाग मनपा…












