- भारतीय जनता युवा मोर्चाचे महापौरांना लेखी निवेदन…
सुरज करांडे, प्रतिनिधी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी चिंचवड (दि. १० फेब्रुवारी २०२६) :- पिंपरी-चिंचवड शहरातील गरजू रुग्णांना आर्थिक मदत मिळावी यासाठी बंद असलेला महापौर वैद्यकीय सहाय्यता निधी तातडीने सुरू करण्यात यावा तसेच निधीची रक्कम वाढविण्यात यावी, अशी मागणी भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने दिनेश यादव यांच्याकडून करण्यात आली आहे.
याबाबत भारतीय जनता युवा मोर्चा, पिंपरी-चिंचवड शहराच्या पदाधिकाऱ्यांनी महापौर रवी भाऊ लांडगे यांना लेखी निवेदन दिले. सध्या हा निधी बंद असल्यामुळे शहरातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांना उपचारासाठी आवश्यक मदत मिळत नसल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
शहरात विविध आजारांमुळे अनेक रुग्णांना मोठा वैद्यकीय खर्च परवडत नाही. अशा रुग्णांसाठी महापौर वैद्यकीय सहाय्यता निधी हा महत्त्वाचा आधार ठरू शकतो. त्यामुळे हा निधी त्वरित कार्यान्वित करून अधिकाधिक नागरिकांना त्याचा लाभ मिळावा, अशी मागणी युवा मोर्चाकडून करण्यात आली आहे.
तसेच वाढत्या वैद्यकीय खर्चाच्या पार्श्वभूमीवर निधीची रक्कम वाढवून अधिक रुग्णांना सहाय्य देण्याची आवश्यकता असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे. या मागणीवर महापालिका प्रशासन व महापौर काय निर्णय घेतात, याकडे शहरवासीयांचे लक्ष लागले आहे.












