- झेस्ट क्रीडा महोत्सवाचे उत्साहात उद्घाटन..
- मान्यवरांकडून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन…
सुरज करांडे, प्रतिनिधी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी चिंचवड (दि. १० फेब्रुवारी २०२६) :-आयआयबीएम कॉलेज ऑफ हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंट, चिखली, पुणे येथे आयोजित झेस्ट क्रीडा महोत्सवाचा उद्घाटन समारंभ संस्थेचे अध्यक्ष धनंजय वर्णेकर यांच्या मार्गदर्शनाखाली उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. यावेळी कु. प्रतिक्षा सुभाष डफळ यांना “झाशीची राणी” पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
या कार्यक्रमाला प्रियदर्शनी क्रीडा प्रतिष्ठानचे अध्यक्ष किरण जाधव, जी-९९ स्पोर्ट्स अकॅडमीचे अध्यक्ष गिरीश बिंजवे, ज्योती बडेकर, आर्यन मस्के, आयआयबीएम कॉलेजचे प्राचार्य प्रदीप फुलकर, विभागप्रमुख अमोल भागवत, विभागप्रमुख अनिकेत वंजारी, विभागप्रमुख कु. प्रतिक्षा डफळ, विभागप्रमुख संदीप जाधव तसेच सर्व शिक्षक व उपशिक्षक उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले.
उद्घाटनप्रसंगी प्रियदर्शनी क्रीडा प्रतिष्ठान व जी-९९ स्पोर्ट्स अकॅडमी यांच्या वतीने कु. प्रतिक्षा डफळ यांना “झाशीची राणी” पुरस्कार देण्यात आला. मागील वर्षभरातील उत्कृष्ट व कौतुकास्पद कामगिरीची दखल घेत हा सन्मान प्रदान करण्यात आला. या सन्मानाबद्दल संस्थेचे अध्यक्ष, प्राचार्य, विभागप्रमुख तसेच शिक्षक व उपशिक्षकांनी त्यांचे अभिनंदन केले.
कार्यक्रमादरम्यान मान्यवरांच्या हस्ते होणाऱ्या क्रीडा स्पर्धांचे श्रीफळ फोडून उद्घाटन करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या हस्ते क्रीडांगणावर ज्योत फिरवून मैदानाचे पूजन करण्यात आले व स्पर्धांना सुरुवात झाली.
प्रमुख पाहुणे किरण जाधव यांनी विद्यार्थ्यांना फिटनेस व नियमित व्यायामाचे महत्त्व पटवून दिले. तर गिरीश बिंजवे यांनी विद्यार्थ्यांनी अभ्यासाबरोबरच आरोग्याची काळजी घ्यावी, शिस्तबद्ध व नीटनेटके जीवन जगावे, असा संदेश दिला.
संस्थेचा आठ दिवस चालणाऱ्या या क्रीडा महोत्सवात क्रिकेट, कबड्डी, व्हॉलीबॉल, डॉजबॉल, धावण्याच्या स्पर्धा, रस्सीखेच, कॅरम, बुद्धिबळ तसेच इलेक्ट्रॉनिक गेम्स अशा विविध स्पर्धांचा समावेश आहे. महोत्सवाचा पहिला दिवस आनंदी व उत्साही वातावरणात संपन्न झाला.












