- दादांचा ‘अपघात’ नसून ‘घात’ असण्याची व्यक्त केली शक्यता..
- उच्चस्तरीय चौकशीची मागणी…
सुरज करांडे, प्रतिनिधी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पुणे (दि. १० फेब्रुवारी २०२६) :- राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी आज दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताच्या घटनेवर पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी अपघातग्रस्त विमानाच्या कंपनीवर निशाणा साधला. गंभीर प्रश्न उपस्थित करत त्यांनी अपघाताचे सर्जिकल स्ट्राईक केल्याचे पाहायला मिळाले. हा अपघात नसून नियोजित घात असण्याची शक्यता असल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला आहे.
या प्रकरणाचा तपास केवळ सीआयडीकडून न करता विमान अपघात तपासात तज्ज्ञ असलेल्या संस्थेकडून करण्याची मागणी रोहित पवार यांनी केली आहे. या संदर्भात त्यांनी काही महत्त्वाचे प्रश्न उपस्थित केले आहेत.
रोहित पवार यांनी म्हटले की, अजित पवार यांच्या दौऱ्याचे वेळापत्रक अचानक बदलण्यात आले. तसेच विमानाची वेळ आणि पायलट बदलण्यात आला होता का, याची सखोल चौकशी होणे गरजेचे आहे.
याशिवाय केंद्रीय विमान मंत्रालयाच्या अहवालात आणि एटीसी ट्रान्स्क्रिप्टमधील वेळेमध्ये विसंगती असल्याचा आरोपही त्यांनी केला. फ्लाइट रडारचा डेटा अपघाताच्या एक मिनिट आधीच बंद पडल्याने संशय अधिक गडद होत असल्याचे त्यांनी नमूद केले.
Visibility कमी असताना विमान उतरविण्याचा निर्णय का घेण्यात आला, तसेच रनवे क्रमांक ११ वरच उतरण्याचा आग्रह का धरण्यात आला, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. अपघातापूर्वी विमान आधीच कमी उंचीवर आणले गेले होते का, याचीही चौकशी होणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
अपघाताच्या शेवटच्या काही मिनिटांमध्ये पायलटकडून कोणताही संवाद न झाल्याचा मुद्दाही त्यांनी मांडला. या सर्व बाबींची निष्पक्ष आणि सखोल चौकशी करून सत्य समोर आणावे, अशी मागणी रोहित पवार यांनी केली आहे.












