- नगरसेवक विनोद नढे यांचे महापौर, आयुक्तांना पत्र..
- शहर विकासातील योगदानाचा गौरव करण्याची केली मागणी…
संतोष जराड, प्रतिनिधी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी चिंचवड (दि. ११ फेब्रुवारी २०२६) :- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मुख्य सभागृहात दिवंगत आमदार लक्ष्मण (भाऊ) पांडुरंग जगताप यांचे तेलचित्र लावण्याची मागणी भाजपचे नगरसेवक विनोद नढे यांनी केली आहे. याबाबत त्यांनी महापौर तसेच महापालिका आयुक्तांना पत्र देऊन प्रशासनाने तातडीने निर्णय घ्यावा, अशी विनंती केली आहे.
पत्रात नमूद केल्यानुसार, पिंपरी चिंचवड शहराच्या जडणघडणीत तसेच विकासात दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांचे मोठे योगदान राहिले आहे. अभ्यासू लोकप्रतिनिधी, कुशल संघटक आणि शहराच्या विकासासाठी सातत्याने कार्य करणारे नेतृत्व म्हणून त्यांची ओळख होती. नगरसेवक, स्थायी समिती अध्यक्ष, महापौर, विधान परिषद सदस्य आणि सलग तीन वेळा विधानसभेचे सदस्य म्हणून त्यांनी शहराच्या सर्वांगीण विकासासाठी योगदान दिल्याचे पत्रात नमूद करण्यात आले आहे.
शहरातील अनधिकृत बांधकामे, रिंगरोडसह पायाभूत सुविधांचा विकास आणि नागरिकांच्या प्रश्नांवर त्यांनी सातत्याने काम केल्याचा उल्लेखही करण्यात आला आहे. महापालिकेच्या मुख्य सभागृहात अनेक ऐतिहासिक निर्णय घेतले जातात. अशा सभागृहात शहराच्या विकासासाठी योगदान देणाऱ्या लोकनेत्याचे तेलचित्र लावल्यास ते पुढील पिढीतील लोकप्रतिनिधींसाठी प्रेरणादायी ठरेल, असे नढे यांनी पत्रात म्हटले आहे.
महापालिकेने दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांचे तेलचित्र मुख्य सभागृहात सन्मानपूर्वक लावण्याचा धोरणात्मक निर्णय घ्यावा आणि त्यासाठी आवश्यक प्रशासकीय प्रक्रिया तातडीने सुरू करावी, अशी मागणीही पत्रातून करण्यात आली आहे.












