- पाच वर्षांत भाजप देणार १४ जणांना संधी?..
- निवडणूक लढवून पराभूत झालेल्यांना स्वीकृत पद मिळणार नाही…
मा. अशोक लोखंडे :- संपादक तथा प्रतिनिधी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी चिंचवड (दि. ११ फेब्रुवारी २०२६) :- महापालिकांमधील स्वीकृत नगरसेवक पदाबाबत भारतीय जनता पक्षाने नवीन फॉर्म्युला निश्चित केल्याची माहिती मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली. यानुसार स्वीकृत नगरसेवक पदाचा कार्यकाळ पाच वर्षांऐवजी अडीच वर्षांचा करण्यात येणार असून त्यामुळे एका कार्यकाळात सात ऐवजी तब्बल १४ जणांना संधी देण्याचा भाजपचा विचार आहे.
पाटील यांनी स्पष्ट केले की, महापालिका निवडणुकीत ज्यांना पक्षाने उमेदवारी दिली होती आणि ते पराभूत झाले आहेत, अशा माजी नगरसेवकांना स्वीकृत नगरसेवक पदाची संधी दिली जाणार नाही. या निर्णयामुळे भाजपच्या पराभूत उमेदवारांमध्ये मोठा हिरमोड झाला आहे. मात्र त्यांनी पुन्हा जनतेमध्ये काम करून निवडणुकीत विजयी व्हावे, अशी अपेक्षा पाटील यांनी व्यक्त केली.
पाटील म्हणाले की, महापालिका निवडणुकीत भाजपकडून ज्यांना तिकीट नाकारण्यात आले किंवा जे तिकीट मिळविण्याच्या स्पर्धेत नव्हते, अशा कार्यकर्त्यांचा विचार करून त्यांना संधी देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. अडीच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केल्याने अधिक कार्यकर्त्यांना संधी मिळेल, असे त्यांनी सांगितले.
तसेच ज्यांना भाजपकडून महापालिका निवडणुकीत तिकीट देण्यात आले होते, त्यांना स्वीकृत नगरसेवक पद देण्याऐवजी त्यांच्या राजकीय भवितव्याचा विचार करून त्यांना महामंडळांमध्ये संधी देण्याचा पक्षाकडून विचार केला जाईल, असेही पाटील यांनी नमूद केले. राज्यभरातील सर्वच महापालिकांसाठी पक्षाकडून हा निर्णय लागू राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.












