- तर, दुसऱ्या घटनेत सार्वजनिक ठिकाणी ग्राहक शोधणाऱ्या दोन महिलांवर गुन्हा..
- देहव्यापाराविरोधात पोलिसांची सलग कारवाई; सहा आरोपी अटकेत…
सुरज करांडे, प्रतिनिधी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी चिंचवड (दि. ११ फेब्रुवारी २०२६) :- पिंपरी-चिंचवड परिसरात अनैतिक व्यापाराविरोधात पोलिसांनी दोन वेगवेगळ्या ठिकाणी कारवाई करत देहव्यापाराचे रॅकेट उघडकीस आणले. दिघी पोलिसांनी हॉटेलमध्ये सुरू असलेल्या देहव्यापारावर छापा टाकून सहा जणांना अटक केली, तर तळेगाव दाभाडे परिसरात सार्वजनिक ठिकाणी ग्राहक शोधणाऱ्या दोन महिलांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दिघी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, देहु फाटा परिसरातील साई पॅलेस हॉटेलमध्ये मंगळवारी (दि. १०) मध्यरात्री सुमारे दोन वाजण्याच्या सुमारास छापा टाकण्यात आला. या कारवाईत हॉटेलमध्ये १७ महिलांकडून पैशांचे आमिष दाखवून देहव्यापार करून घेत असल्याचे उघड झाले. या प्रकरणी पोलिसांनी कृष्णा सुरेश पाटील आणि राज मोहन शेट्टी (दोघेही मॅनेजर), संजय अमीन बावरी, साबीर अक्तर अली, भरत बिराजदार आणि विक्रम वढ यांना अटक केली आहे. तसेच हॉटेल चालक पद्मलोचन दास उर्फ कालुशेठ आणि मालक अवधुत गाढवे यांचा शोध सुरू आहे. कारवाईदरम्यान पोलिसांनी ५१ हजार ७० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
दरम्यान, तळेगाव दाभाडे परिसरातही अनैतिक व्यापारासंदर्भात कारवाई करण्यात आली. सोमाटणे फाटा ते तळेगाव रोड परिसरात सार्वजनिक ठिकाणी ग्राहक शोधण्याचा प्रयत्न करताना दोन महिलांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. त्यांनी सार्वजनिक ठिकाणी अश्लील हावभाव करत येणाऱ्या-जाणाऱ्या नागरिकांना त्रास दिल्याचा आरोप आहे. या प्रकरणी अद्याप अटक करण्यात आलेली नाही.
दोन्ही कारवाया अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्ष व स्थानिक पोलिसांच्या पथकांनी केल्या असून पुढील तपास संबंधित पोलीस ठाण्यांकडून सुरू आहे.












