सुरज करांडे, प्रतिनिधी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी चिंचवड (दि. १२ फेब्रुवारी २०२६) :- पुनावळेतील जमिनीच्या व्यवहारात फेरफार करून फसवणूक केल्याप्रकरणी दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी मुझफ्फरअली मुशाहिदअली सय्यद आणि मेहफुजअली मुशाहिदअली सय्यद (रा. विशालनगर, पिंपळे निलख, पुणे) यांच्यावर कारवाई करण्यात आली असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
याबाबत योगेश वसंत वाणी (वय ५०, रा. पिंपरी) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी फिर्यादीच्या मालकीच्या जमिनीची व शेजारील मिळकतीची खरेदी-विक्री करण्याचे आमिष दाखवत समजुतीचा करारनामा करून घेतला. त्यानंतर मिळकत धारक हनुमंत सायकर यांच्याकडून ३० गुंठे क्षेत्र विकत घेताना तसेच फिर्यादीच्या ४४ गुंठे क्षेत्राची मोजणी करताना फिर्यादी प्रत्यक्ष उपस्थित नसताना आरोपींनी करारनाम्याचा गैरफायदा घेतल्याचा आरोप आहे. आरोपींनी संगनमताने मोजणी अधिकाऱ्यांची दिशाभूल करून चुकीची हद्द दर्शविली. या मोजणीत सुमारे १२ ते १४ मीटर जागेवर अतिक्रमण झाल्याचेही तक्रारीत नमूद आहे.
तसेच संबंधित जागेवरील वहिवाटीसाठी असलेला रस्ता मोजणीत समाविष्ट न करता नंतर मिळालेल्या मोजणीच्या आधारे २६ ऑगस्ट २०२२ रोजी बांधकाम परवाना मिळवून घेतल्याचे उघड झाले आहे. या परवान्याचा आधार घेत आरोपींनी फिर्यादीच्या मालकीच्या जागेवर बेकायदेशीर बांधकाम केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या संबंधित कलमानुसार गुन्हा नोंदविला असून पुढील तपास सुरू आहे.












