- शहराध्यक्ष बदलाचीही चर्चा?..
- जगदीश शेट्टी, अजित गव्हाणे यांच राजकीय पुनर्वसन होण्याची शक्यता?…
अशोक लोखंडे :- संपादक तथा प्रतिनिधी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी चिंचवड (दि. १२ फेब्रुवारी २०२६) :- पिंपरी चिंचवड शहर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये लवकरच मोठे संघटनात्मक बदल होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. अजित पवार यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारली असून पक्षाची सर्व सूत्रे त्यांच्या हातात गेली आहेत.
सुनेत्रा पवार यांच्या सूचनेनुसारच जेष्ठ नगरसेवक भाऊसाहेब भोईर यांना पिंपरी-चिंचवड महापालिकेत विरोधी पक्षनेतेपदाची जबाबदारी देण्यात आल्याची माहिती मिळत आहे.
दरम्यान महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादीला अपेक्षित यश न मिळाल्याने शहरातील पक्ष संघटना अधिक सक्षम करण्यावर भर दिला जाणार असल्याचे बोलले जात आहे. त्याचाच भाग म्हणून पिंपरी-चिंचवड शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या संघटनेत मोठे फेरबदल होणार असून शहराध्यक्ष देखील बदलण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
माजी सत्तारूढ पक्षनेते जगदीश शेट्टी, माजी जेष्ठ नगरसेवक अजित गव्हाणे यांचे राजकीय पुनर्वसन होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. महापालिका निवडणुकीत या दोघांनाही पक्षाकडून उमेदवारी मिळाली नव्हती. त्यामुळे या दोघांपैकी एकाच्या गळ्यात शहराध्यक्षपदाची जबाबदारी तर, दुसऱ्याची स्विकृत नगरसेवकपदी नियुक्ती होऊ शकते, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
दरम्यान, सध्याचे शहराध्यक्ष तथा नगरसेवक योगेश बहल यांची राज्यातील एखाद्या महामंडळावर नियुक्ती होण्याची दाट शक्यता असल्याचेही सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.












