- हिंजवडीत घडला फसवेगिरीचा प्रकार…
सुरज करांडे, प्रतिनिधी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी चिंचवड (दि. १२ फेब्रुवारी २०२६) :- हिंजवडी परिसरात बनावट स्टँप पेपर व नोटरी कागदपत्रांच्या आधारे फसवणूक केल्याप्रकरणी एका व्यक्तीस अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी हिंजवडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस हवालदार अजिनाथ विठ्ठल सावंत (नेमणूक हिंजवडी पोलीस स्टेशन) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सिमांता कामिनी कुमार दास (वय ३२, रा. नेरे, दत्तवाडी, मुळशी, पुणे; मूळ रा. जिल्हा बर्धमान, पश्चिम बंगाल) याने एप्रिल २०२५ मध्ये ई-सुविधा इंडिया केंद्र, हिंजवडी येथे बनावट कागदपत्रे तयार केली.
आरोपीने मूळ स्टँप पेपरची रंगीत छायांकित प्रत काढून बनावट स्टँपच्या आधारे नोटरी तयार केल्याचा आरोप आहे. संबंधित व्यक्तीकडे सध्याच्या राहत्या पत्त्याचा कोणताही वैध पुरावा नसताना घरमालकाचे नाव वापरून बनावट नोटरी अॅग्रीमेंट व इतर शासकीय कागदपत्रे तयार करण्यात आली.
या बनावट कागदपत्रांच्या आधारे कंपनीचे ओळखपत्र (आयडी), बँक खाते उघडणे, गॅस कनेक्शन तसेच चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र मिळविण्याचा प्रयत्न करण्यात आला. या प्रकारातून शासनाची व सुमारे १० नागरिकांची मिळून अंदाजे २० हजार रुपयांची फसवणूक झाल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे.
भारतीय न्याय संहितामधील संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीस अटक करण्यात आली आहे. पुढील तपास हिंजवडी पोलीस करत आहेत.












