- विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न; प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी…
मा. अशोक लोखंडे :- संपादक तथा प्रतिनिधी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी चिंचवड (दि. १२ फेब्रुवारी २०२६) :- फुगेवाडी येथील भूयारीमार्गाची मोठ्या प्रमाणावर दुरवस्था झाली असून नागरिकांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून या भूयारीमार्गाची रंगरंगोटी न झाल्यामुळे भिंतींची अवस्था अत्यंत खराब झाली आहे. तसेच पावसाळी पाणी निचऱ्यासाठी दोन्ही बाजूंना करण्यात आलेल्या चरांमध्ये मोठ्या प्रमाणावर कचरा साचला असून त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरत आहे.
या भूयारीमार्गाजवळ महानगरपालिकेची शाळा असल्यामुळे मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी या मार्गाचा वापर करतात. मात्र साचलेल्या घाण पाण्यामुळे विषाणूजन्य आजार पसरण्याची शक्यता निर्माण झाली असून पालकांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे.
याशिवाय संध्याकाळच्या वेळी या ठिकाणी मद्यपींचा अड्डा भरत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. त्यामुळे अनेक नागरिक व महिला संध्याकाळी या भूयारीमार्गातून प्रवास करण्यास टाळाटाळ करत आहेत. पोलिसांकडून अधूनमधून पेट्रोलिंग केले जात असले तरी त्याचा प्रभाव दिसून येत नसल्याची नाराजी नागरिकांनी व्यक्त केली आहे.
या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अर्बन सेल शहराध्यक्ष प्रदीप गायकवाड यांनी प्रशासनाने तात्काळ लक्ष देऊन भूयारीमार्गाची स्वच्छता, दुरुस्ती व सुरक्षेची उपाययोजना करावी, अशी मागणी केली आहे. अन्यथा नागरिकांच्या आरोग्य व सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनू शकतो, अशीही त्यांनी चिंता व्यक्त केली आहे.












