न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी चिंचवड (दि. १३ फेब्रुवारी २०२६) :- देहू नगरपंचायतीसमोर मालमत्ता व पाणी कर वसुलीचे मोठे आव्हान उभे ठाकले असून आर्थिक वर्ष संपण्यास कमी कालावधी शिल्लक असताना प्रशासनाला थकबाकी वसुलीसाठी धडपड करावी लागत आहे. विशेष मोहिम राबवूनही अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याने प्रशासनाने थकबाकीदारांवर कठोर कारवाई सुरू केली आहे.
नगरपंचायतीने सुरू केलेल्या वसुली मोहिमेत तीन दिवसांत सुमारे १६ लाख रुपयांची वसुली करण्यात आली असली तरी एकूण १९ कोटी रुपयांच्या उद्दिष्टाच्या तुलनेत ही रक्कम अत्यंत कमी असल्याचे स्पष्ट होत आहे. थकबाकी भरण्यास टाळाटाळ करणाऱ्या ३० मिळकतधारकांचे पाणी नळजोड तोडण्याची कारवाई प्रशासनाने केली आहे.
चालू आर्थिक वर्षात मालमत्ता कराच्या माध्यमातून सुमारे १५ कोटी रुपये तर पाणी करातून ४ कोटी रुपये वसूल करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. मात्र वसुलीचा वेग मंद असल्याने वित्त आयोगाच्या अनुदानावरही परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. १०० टक्के मालमत्ता कर वसुलीची अट पूर्ण न झाल्यास नगरपंचायतीला आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागू शकते.
कर वसुलीसाठी प्रशासनाकडून विविध सवलती व योजना राबविण्यात आल्या होत्या. मुदतीपूर्वी कर भरणाऱ्यांना सवलत देण्यासह लकी ड्रॉच्या माध्यमातून गृहोपयोगी वस्तूंचे वाटप करण्यात आले होते. तसेच अभय योजनेंतर्गत व्याजावर मोठी सूट देऊनही अनेक मिळकतधारकांनी प्रतिसाद दिला नसल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे.
थकबाकी वसुलीसाठी प्रशासनाकडून नागरिकांना फोन, संदेश व नोटिसांच्या माध्यमातून संपर्क साधला जात आहे. परिसरात रिक्षामधून दवंडी देऊन जनजागृती केली जात आहे. तरीही अनेक नागरिक कर भरण्याकडे दुर्लक्ष करत असल्याचे समोर येत आहे.
वसुली मोहिमेदरम्यान काही ठिकाणी अनधिकृत नळजोड व मोटरच्या सहाय्याने पाणी उपसा केल्याचे प्रकार उघड झाले आहेत. अशा बेकायदेशीर प्रकारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी संबंधितांवर २० हजार रुपयांपर्यंत दंड आकारण्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे. थकबाकीदारांनी तातडीने कर भरला नाही तर पुढील काळात आणखी कठोर कारवाई केली जाणार असल्याचेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.












