संतोष जराड, प्रतिनिधी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी चिंचवड (दि. १६ फेब्रुवारी २०२६) :- पिंपरी-चिंचवड महापालिकेत सत्ताधारी भाजपने स्थायी समितीतील गणित आपल्या बाजूने वळवण्यासाठी महत्त्वाची खेळी केली आहे. सुरुवातीला ८४ नगरसेवकांची स्वतंत्र गटनोंदणी करण्यात आली होती. मात्र एका अपक्ष नगरसेवकाला सोबत घेतल्यानंतर स्थायी समितीतील जागांचे समीकरण बदलत असल्याचे स्पष्ट झाल्याने भाजपने तातडीने संयुक्त गटनोंदणीचा निर्णय घेतला.
महापालिकेच्या स्थायी समितीत एकूण १६ सदस्य असतात. पक्षनिहाय नगरसेवक संख्येनुसार या जागांचे वाटप ठरते. महापालिकेत भाजपचे ८४ नगरसेवक, राष्ट्रवादी काँग्रेस चे ३७, शिवसेनेचे ६ आणि एक अपक्ष नगरसेवक आहे. सुरुवातीच्या गणितानुसार भाजपला १०, राष्ट्रवादीला ४ आणि शिवसेनेला १ सदस्यपद मिळण्याची शक्यता होती.
मात्र अपक्ष नगरसेवकाने भाजपला पाठिंबा दिल्याने सत्ताधाऱ्यांची ताकद ८५ वर पोहोचली. परिणामी स्थायी समितीत भाजपला आता ११ सदस्यपदे मिळणार असून, राष्ट्रवादी काँग्रेसला चार जागांवरच समाधान मानावे लागणार आहे. शिवसेनेला एकच जागा मिळणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
या बदललेल्या समीकरणाचा परिणाम इतर विषय समित्यांवरही होणार आहे. उपलब्ध माहितीनुसार, इतर समित्यांमध्ये शिवसेनेला प्रतिनिधित्व मिळण्याची शक्यता कमी असून, त्या ठिकाणी भाजपचे सहा आणि राष्ट्रवादीचे तीन सदस्य असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
एकूणच, अपक्षाला सोबत घेत सत्ताधाऱ्यांनी स्थायी समितीतील आपले वर्चस्व अधिक मजबूत केले असून, विरोधकांचे संख्याबळ मर्यादित ठेवण्यात यश मिळवले आहे.












