- जलकुंभ पूर्ण क्षमतेने कार्यान्वित होण्यापूर्वीच गळती; गुणवत्तेवरही प्रश्नचिन्ह?..
- मोशी- बोऱ्हाडेवाडी परिसरात तीव्र पाणीटंचाईची समस्या…
सुरज करांडे, प्रतिनिधी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी चिंचवड (दि. १६ फेब्रुवारी २०२६) :- पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक २ बोऱ्हाडेवाडी येथील पाणीपुरवठा प्रकल्पांतर्गत उभारण्यात येत असलेल्या जलकुंभाचे काम अद्याप पूर्ण न झाल्याने स्थानिक नागरिकांकडून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. सुमारे २५ लक्ष लिटर क्षमतेची ही पाण्याची टाकी सन २०२४-२०२५ या आर्थिक वर्षात पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र मुदत संपूनही काम सुरूच असल्याने प्रकल्प रखडल्याचे स्पष्ट झाले आहे.
अद्ययावत पद्धतीने उभारण्यात येत असलेल्या या जलकुंभातून सध्या पाणी गळती सुरू असल्याचे स्थानिकांकडून सांगण्यात येत आहे. टाकी पूर्ण क्षमतेने कार्यान्वित होण्यापूर्वीच गळती सुरू झाल्याने कामाच्या गुणवत्तेबाबतही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत.
दरम्यान, पिंपरी चिंचवड शहराप्रमाणेच उपनगर मोशी आणि बोऱ्हाडेवाडी परिसरात सध्या दिवसाआड पद्धतीने पाणीपुरवठा केला जात आहे. अनेक भागांत कमी दाबाने पाणी येत असल्याच्या तक्रारही नागरिकांच्या आहेत. सोसायटीकरण झपाट्याने होत असल्याने पाण्याची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे. अपूर्ण जलकुंभ पूर्णत्वास गेल्यास मोठ्या प्रमाणावर नागरिकांची पाणीटंचाईची समस्या कमी होऊ शकते. त्यामुळे पिंपरी चिंचवड महापालिकेच्या संबंधित विभागाने कामाची गती वाढवून जलकुंभ तातडीने पूर्ण करावा. पाणी गळतीची समस्या दूर करून नियमित पाणीपुरवठा सुरू करावा, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे.
याबाबत नुकतीच अधिकाऱ्यांची बैठक घेऊन त्यांना काम वेगाने पूर्ण करण्याच्या सूचना केल्या आहेत. पुन्हा आढावा बैठक घेऊन कामाची स्थिती तपासली जाईल.
– निखील बोऱ्हाडे, नगरसेवक पिंपरी-चिंचवड मनपा…












