सुरज करांडे, प्रतिनिधी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी चिंचवड (दि. १६ फेब्रुवारी २०२६) :- वाकड परिसरात एका इमारतीच्या पार्किंगमध्ये असलेल्या खोल खड्ड्यात पडून तीन वर्षांची मुलगी गंभीर जखमी झाल्याची घटना उघडकीस आली आहे. १४ फेब्रुवारी रोजी रात्री सुमारे ९ वाजता हा प्रकार घडला. संबंधित घटनेचे चित्रण सीसीटीव्हीमध्ये झाले आहे.
वाकड येथील पिंक सिटी रोडवरील एका इमारतीत ही दुर्घटना घडली. श्रीजा सांगळे (वय ३ वर्षे ९ महिने) असे जखमी बालिकेचे नाव आहे. पार्किंगमध्ये सुमारे १५ फूट खोल खड्डा उघडाच ठेवण्यात आल्याचा आरोप असून त्या ठिकाणी कोणतीही संरक्षण भिंत किंवा जाळी नव्हती. इतर मुलांसोबत खेळताना ती अचानक त्या खड्ड्यात कोसळली.
या अपघातात तिच्या डोक्याला, पाठीला तसेच हात-पायांना दुखापत झाली आहे. तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तिची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळाली आहे.
याप्रकरणी वाकड पोलीस स्टेशन येथे बिल्डर व संबंधित कंपनीच्या जबाबदार व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पार्किंगमध्ये आवश्यक सुरक्षाव्यवस्था न ठेवल्यामुळे ही घटना घडल्याचा आरोप करण्यात आला आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.












