- मा. अशोक लोखंडे, संपादक तथा प्रतिनिधी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. १८ फेब्रुवारी २०२६) :- पिंपरी-चिंचवड महापालिकेत भारतीय जनता पक्षाची बहुमतात सत्ता आल्यानंतर महापौर, सत्तारूढ पक्षनेते यांच्या निवडी झाल्या आहेत. शहराच्या राजकारणात नव्या समीकरणांची सुरुवात झाली असून नागरिकांच्या अपेक्षा देखील वाढल्या आहेत.
भाजपचे महापौर रवी लांडगे आणि विरोधी पक्षनेते पदी निवड झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नगरसेवक भाऊसाहेब भोईर यांनी नागरिकभिमुख काम करण्याची भूमिका घेतल्याने त्यांच्या कार्यपद्धतीची चर्चा शहरात सुरू आहे. सर्वसामान्य नागरिक, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी थेट संवाद साधण्यावर त्यांनी भर दिल्याचे दिसून येत आहे.
मात्र, दुसरीकडे सत्तारूढ पक्षनेते प्रशांत शितोळे यांच्या कारभाराबाबत महापालिकेत वेगळीच चर्चा रंगू लागली आहे.
नागरिकांशी थेट संवाद साधण्याऐवजी त्यांना अॅटीचेंबर्सचा मोह सुटत नसल्याची टीका त्यांच्यावर होत आहे. विविध भागांतून नागरिक त्यांना भेटण्यासाठी येत असतात. पत्रकारही माहिती घेण्यासाठी येतात; मात्र दीर्घ प्रतीक्षा करूनही भेट न झाल्याने अनेकांना वैतागून परत जावे लागत असल्याची भावना व्यक्त होत आहे.
महापालिकेतील सत्ताधारी पक्षाच्या नेतृत्वाकडून अधिक सक्रिय आणि खुल्या संवादाची अपेक्षा व्यक्त केली जात असताना नागरिकांशी थेट संपर्क आणि पारदर्शक कार्यपद्धत यापासून अलिप्त राहणारे सत्तारूढ पक्षनेते यांच्या कामकाजात नक्कीच सुधारणा होण्याची अपेक्षा शहरवासीय व्यक्त करीत आहेत.











