- विकासकामे व नागरी सेवांवर होतोय परिणाम – रविराज काळे…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी चिंचवड (दि. १९ फेब्रुवारी २०२६) :- पिंपरी-चिंचवड महापालिकेत नव्या महापौरांची निवड होऊनही आयुक्तपदावर अद्याप पूर्णवेळ नियुक्ती न झाल्याने शहरातील विकासकामे आणि दैनंदिन नागरी सेवा बाधित होत असल्याचा आरोप आम आदमी पार्टीचे शहराध्यक्ष रविराज काळे यांनी केला आहे. मुख्यमंत्र्यांनी महापालिकेत तातडीने कायमस्वरूपी आयुक्त नेमावा, अशी मागणी त्यांनी निवेदनाद्वारे केली.
माजी आयुक्त शेखर सिंह यांची बदली होऊन त्यांच्याकडे नाशिक कुंभमेळ्याची जबाबदारी देण्यात आली. त्यानंतर ‘महामेट्रो’चे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर यांच्याकडे आयुक्तपदाचा तात्पुरता पदभार देण्यात आला. मात्र चार महिने उलटूनही पूर्णवेळ आयुक्त न नेमल्याने प्रशासनाला ठोस दिशा मिळत नसल्याची भावना व्यक्त करण्यात आली आहे.
अनियमित पाणीपुरवठा, कचरा संकलन व प्रक्रिया व्यवस्थेतील त्रुटी, अपूर्ण रस्ते-पूल प्रकल्प, निविदा व अर्थसंकल्पीय निर्णयांतील विलंब आदी प्रश्नांवर तातडीचे निर्णय आवश्यक आहेत. दोन जबाबदाऱ्या सांभाळत असल्याने आयुक्त नागरिकांना नियमित भेटत नसल्याचाही आरोप ‘आप’कडून करण्यात आला. केलेल्या कार्यवाहीबाबत लेखी उत्तर देण्याची मागणीही काळे यांनी केली आहे.












